तीन नौसैनिकांचा मृत्यू; मुंबई नौदल गोदीत युद्धनौकेवर स्फोट; अनेक जण जखमी
![Three sailors killed; Mumbai Navy shipwreck; Many were injured](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/ranvir.jpg)
मुंबई | नौदलाच्या ‘आयएनएस रणवीर’ या युद्धनौकेवर मंगळवारी स्फोट होऊन तीन नौसैनिकांचा मृत्यू झाला़ या दुर्घटनेत दहाहून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त असून, याबाबतचा तपशील रात्री उशिरापर्यंत कळू शकला नाही़नौदल डॉकयार्ड येथे ‘आयएनएस रणवीर’ या युद्धनौकेच्या अंतर्गत भागात मंगळवारी सायंकाळी ४ .३० च्या सुमारास स्फोट झाला़ तेथील अग्निशमन विभाग व युद्धनौकेवरील यंत्रणांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले़ ते दीड तास सुरू होते़
स्फोटामुळे आगीबरोबरच मोठ्या प्रमाणात धूर पसरला़ तीन नौसैनिकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे़ त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल.नौदलाकडून मृतांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. या तिन्ही मृत नौसैनिकांची कुटुंबे सध्या आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथे असून, त्यांना या दुर्घटनेची माहिती देण्यात आली आहे. ही कुटुंबे बुधवारी मुंबईत दाखल होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले़या दुर्घटनेत अन्य ११ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, जखमींबाबत नौदलाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
ही युद्धनौका दोन दिवसांत विशाखापट्टणमला निघणार होती़ त्यामुळे युद्धनौकेवर मोठ्या प्रमाणावर कर्मचारी होते, असे सूत्रांनी सांगितले़ ‘आयएनएस रणवीर’ ही राजपूत क्लासमधील विनाशिका आहे. ऑक्टोबर १९८६ मध्ये या विनाशिकेचे जलावतरण करण्यात आले होते.चौकशीचे आदेशयुद्धनौकेवरील स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही़ या दुर्घटनेबाबत चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे नौदलाकडून सांगण्यात आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे़ स्फोटानंतर डॉकयार्ड परिसरातील सर्वच यंत्रणांना सतर्क करण्यात आले. स्फोटाच्या आवाजामुळे डॉकयार्ड परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.