राज्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढला, पुढचे 10 दिवस अत्यंत महत्त्वाचे- राजेश टोपे

मुंबई – राज्यात कोरोनानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. अशात म्युकरमायकोसिस या आजाराने राज्यात शिरकाव केला आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहे. म्युकरमायकोसिस संदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
सध्या राज्यात म्युकरमायकोसिसचे 850 रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी दोन लाख एम्फोटेरेसीन बी इंजेक्शन्सची गरज आहे. सरकार त्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र ही इंजेक्शन्स 31 मे नंतरच उपलब्ध होऊ शकतील. परिणामी पुढील 10 दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून करण्यात येणार आहे. या आजारात लागणाऱ्या सर्व औषधांचा खर्चही या योजनेतून दिला जाणार आहे, असं राजेश टोपेंनी सांगितलं आहे.
दरम्यान, करमायकोसिस झालेल्या रुग्णाच्या कुटुंबाकडे कुठल्याही रंगाचे अर्थात पिवळे, केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड असेल त्या सर्वांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मदत दिली जाईल, असंही राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे.





