आता ठरवलंय घरी बसायचं…; नारायण राणेंचे राजकीय निवृत्तीचे संकेत

सिंधुदुर्ग : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांनी आपल्या राजकीय निवृत्तीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. “आता ठरवलंय घरी बसायचं… दोन्ही मुलांना सांगेन, नांदा सौख्य भरे,” असे भावनिक वक्तव्य करत राणेंनी कार्यकर्त्यांना उद्देशून भाष्य केले.
सिंधुदुर्गात झालेल्या त्यांच्या जाहीर सत्कार सोहळ्यात बोलताना नारायण राणे म्हणाले की, वय वाढत चालल्याने शरीर थकत आहे. दोन्ही मुलं निलेश आणि नितेश राणे राजकारणात स्थिरावली असून, यापुढे विकासात्मक राजकारणाची धुरा ते सांभाळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “माझ्यानंतर विकासाचं राजकारण निलेश आणि नितेश करतील. त्यांनी हाक दिल्यावर ‘ओ’ द्या,” असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
राजकारणातील अनुभव सांगताना राणे म्हणाले की, “राजकारणात कट-कारस्थानं सुरू आहेत. त्यामुळेच आता घरी बसायचा निर्णय घेतला आहे.” त्यांनी स्पष्ट केले की, दोन्ही मुलं चांगलं काम करत आहेत आणि चांगल्याला जोपासण्याची गरज आहे.
हेही वाचा – विमानातील ही सुविधा बंद! डीजीसीएचे निर्देश…
सभेत बोलताना राणेंनी आपल्या साधेपणाचा उल्लेख करत सांगितले, “आजही नारायण राणे रस्त्यावर भाजी घेतो. माझ्या गाडीला काळ्या काचा नाहीत. माणुसकी हाच माझा धर्म आहे.” अनेकांनी आपल्या राजकीय वाटचालीत अडथळे आणल्याचे सूचक विधान करत त्यांनी सांगितले की, त्या विषयावर आज बोलणार नाही, मात्र संघर्ष कायम राहिला आहे.
महायुतीच्या कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले, “एकत्र रहा, पैशासाठी राजकारण करू नका. असे पैसे पचत नाहीत. मला कोणाचीही भीती नाही.” तसेच द्वेषाच्या राजकारणाला थारा देऊ नका, असा सल्लाही त्यांनी दिला.
नारायण राणे पुढे म्हणाले, “पक्ष सांभाळा, स्वार्थ करू नका. या जिल्ह्यात माझ्याआधी आणि माझ्यानंतर माझ्यासारखं काम कुणी केलं असेल तर दाखवा.” या वक्तव्यांमुळे नारायण राणे लवकरच सक्रिय राजकारणातून बाजूला होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यांच्या या घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.




