… तर राज्याला महिन्याभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, टास्क फोर्स व्यक्त केली भिती
![… So the threat of a third wave of corona to the state in a month, the task force expressed fears](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/1800x1200_coronavirus_1-3.jpg)
मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात थैमान माजवले होते. आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत होत्या. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचेही चांगलेच हाल झाले. आता राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही धोका वर्तवला जात आहे. या तिसऱ्या लाटेत कोरोना व्हायरसचा व्हेरिएंट डेल्टा प्लसची भिती टास्क फोर्सने व्यक्त केली आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्येही या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहेत. तसेच, कोविडच्या नियमांचं योग्य पालन न केल्यास एक ते दोन महिन्यांत महामारीची तिसरी लाट राज्यात येण्याची भीती असल्याचं मत टास्क फोर्सनं व्यक्त केलं.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारनं आधीच पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून आवश्यक त्या औषधी, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता राहील तसेच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा राहील हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. तसेच, कोविडच्या नियमांचं योग्य पालन न केल्यास एक ते दोन महिन्यांत महामारीची तिसरी लाट राज्यात येण्याची भीती असल्याचं मत टास्क फोर्सनं व्यक्त केलं.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंटमुळे रुग्णांची संख्या खूपच जास्त होती. त्यामुळे या नव्या व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेतही रुग्णांची संख्या जास्त असण्याची शक्यता जास्त आहे. कोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटेत राज्यात सुमारे 19 लाख आणि दुसऱ्या लाटेत सुमारे 40 लाख रुग्णांची नोंद झाली. आरोग्य अधिकाऱ्यानं म्हटलं की, तिसऱ्या लाटेत कोरोनाचे 8 लाख सक्रिय रूग्णही दिसू शकतात, ज्यांपैकी त्यात दहा टक्के मुलांचा समावेश असू शकतो.
कोविड 19 च्या तिसर्या लाटेसाठी उपाययोजना करणं तसंच तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीत आरोग्य विभागानं केलेल्या सादरीकरणात कोरोनाची नवी लाट महाराष्ट्रात येण्याची शक्यता असल्यास त्यातील संभाव्य परिस्थिती मांडली गेली.
…तर महिना, दोन महिन्यात तिसरी लाट
यासंदर्भात टास्क फोर्समधील डॉक्टर्स, वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेतच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी राज्यभर सिरो सर्व्हेक्षण करणे, मोठ्या प्रमाणावर लसीकरण पूर्ण करणे यावर भर देताना निर्बंधांचे पालन काटेकोरपणे होणे गरजेचे आहे असे सांगितले. गर्दी वाढली आणि आरोग्याचे नियम पाळले गेले नाहीत तर दुसऱ्या लाटेतून सावरता सावरता आपण महिन्या दोन महिन्यात तिसऱ्या लाटेलाही सामोरे जाऊ अशी अशी भीती व्यक्त केली.
लसीकरणानंतरही नियमांचे पालन करणे आवश्यक
पहिल्या लाटेच्या वेळेस आपल्याकडे सुविधांची कमी होती, त्यात आपण वाढ करीत गेलो, दुसऱ्या लाटेने देखील आपल्याला बरेच काही शिकविले. ही लाट ओसरत असून त्यातील अनुभवातून आपल्याला आवश्यक ती औषधी, आरोग्य सुविधा, बेड्स, ऑक्सिजन उपलब्धता या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करावे लागेल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की ऑगस्ट- सप्टेंबर पासून देशाला 42 कोटी लसी मिळताहेत अशी माहिती मिळते आहे. त्यामुळे लसीकरण वेगाने सुरु होऊन महाराष्ट्रालाही त्याचा फायदा होईल. लसीकरण हा या लढाईत महत्वाचा भाग असला तरी आरोग्य विषयक नियमांचे पालन करणे, मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे हे अत्यावश्यक आहे.
या बैठकीत पुढच्या काळात लागणारी संभाव्य औषधे, त्यांची खरेदी , त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद, आरटीपीसीआर कीट, मास्क, पीपीई किट्स अशा बाबींवर विस्तृत चर्चा झाली, मुख्यमंत्र्यांनी सर्व सबंधित यंत्रणांनी समन्वयाने हे उपलब्ध राहील असेही सांगितले.