बेशिस्त वाहनचालकांना चपराक! मुंबईत विरुद्ध दिशेने गाडी चालविल्यास गुन्हा दाखल होणार
मुंबई | मुंबई पोलिस आज सोमवारपासून विरूद्ध दिशेने गाडी चालवणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करणार असून चालकांची गाडीही जप्त करणार आहेत. तसेच आदेशच मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी त्यांच्या फेसबुक लाइव्हमध्ये दिले आहेत.
संजय पांडे हे प्रत्येक रविवारी मुंबईकरांशी फेसबुकद्वारे संवाद साधणार असून आठवड्यांच्या कामांची माहिती देणार आहेत. मुंबईत बेशिस्त वाहन चालकांना वठणीवर आणण्याचे मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी ठरवले आहे. यासाठी पांडे यांनी सर्व पोलिस ठाण्याच्या वरिष्ठांना व विशेषता वाहतूक पोलिसांना विरूद्ध दिशेने गाडी चालवणारे व विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. तसेच हेल्मट न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
मात्र विरूद्ध दिशेने गाडी चालवणाऱ्यांवर थेट गुन्हा नोंदवून गाडी जप्त करण्याचे आदेश पांडे यांनी दिले आहेत.यामुळे गाडी चालकाला अनेक ठिकाणी फिरावे लागेल, कायदेशीररित्या न्यायालयासमोर जावे लागेल,मी माझे अधिकारी व अंमलदारांना याप्रकरणी भादंवि कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत. आज सोमवारपासून ही कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी सर्व सामान्याच्या समस्या जाणूंन पांडे यांनी आपण गाड्या टोइंग बंद करण्याच्या विचारात असल्याचे सांगितले होते. फक्त नागरिकांनी कुठेही वाहतूकीला अडथळा ठरेल अशा ठिकाणी गाड्या न लावण्याची विनंती केली होती





