Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

रायगडावर राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरवण्यास शिवप्रेमींचा विरोध

रायगड – शिवछत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद ६ डिसेंबर रोजी स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडावर येत आहेत. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव हॅलिकॉप्टर रायगड किल्ल्यावर उतरवले जाणार आहे. मात्र राष्ट्रपतींच्या दौऱ्याला आमचा विरोध नाही पण किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर हॅलिकॉप्टर आम्ही उतरु देणार नाही असा पवित्रा येथील शिवप्रेमींनी घेतला आहे.

पूर्वी किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर हॅलिपॅड होते. या ठिकाणी हॅलिकॉप्टर उतरताना अगर उड्डाण घेताना मोठ्या प्रमाणात धूळ, माती, केरकचरा उडत असे. ही धूळ, माती होळीच्या माळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर उडत असल्याने १९९६ ला येथे उपोषण करून हा हॅलिपॅड येथून काढुन टाकण्यात आला होता. सुमारे २५ वर्षांनंतर शिवरायांच्या अवमानाचा तोच प्रश्न पुन्हा निर्माण होत असल्याने शिवप्रेमींकडून विरोध केला जात आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे किल्ले रायगडावर भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणार आहेत. दरम्यान राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त तीन ते सात डिसेंबर या कालावधीत किल्ले रायगडावर नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. किल्ले रायगड, रायगड रोप-वे, रायगड किल्ल्याच्या आजुबाजूकडील परिसर हे तसेच माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचाड रस्ता व नातेगाव ते पाचाड बाजुकडील रस्ता सुद्धा सुरक्षिततेच्या कारणास्तव पर्यटकांकरीता बंद करण्यात येणार आहे. यापूर्वी १९८० साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३०० व्या पुण्यतिथी दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी दुर्गराज रायगडवर आल्या होत्या. तर १९८५ साली राजसदरेवर उभारण्यात आलेल्या मेघडंबरीचे अनावरण करण्यासाठी माननीय राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग रायगडावर आले होते. ३ एप्रिल १९९९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी किल्ल्याला भेट दिली होती.

राष्ट्रपती कोविंद स्वतः शिवभक्त असून २०१८ साली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने राजधानी दिल्ली येथे आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याच सोहळ्यात युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी माननीय राष्ट्रपती महोदयांना छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र भेट म्हणून दिले होते. त्यापूर्वी राष्ट्रपती भवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा नसल्याने सदरचे तैलचित्र राष्ट्रपती भवनामध्ये त्यांनी अत्यंत अभिमानाने लावलेले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button