13 तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना अटक
![Sachin Waze's bail application rejected by NIA court](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/Sachin-Vaze.jpg)
मुंबई – मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ही कारवाई केली आहे. मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणात आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वाझे यांची भूमिका संशयास्पद असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते एटीएस आणि एनआयएच्या रडारवर होते. याप्रकरणी शनिवारी (13 मार्च) सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 11.30 वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती, अखेर 13 तासांच्या चौकशीअंती त्यांना अटक करण्यात आली आहे.
सचिन वाझेंवर मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी आणि स्फोटकांच्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी आरोप होत आहेत. त्यापैकी एनआयए सध्या अंबानी स्फोटक प्रकरणाचा तपास करत आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार एनआयएने अंबानी स्फोटक प्रकरण राज्याकडून आपल्याकडे हस्तांतरीत केलंय. याच प्रकरणी एनआयए कसून तपास करतेय. एनआयएने सचिन वाझेंवर अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांच्यावर अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची गाडी उभी करण्यात सहभाग घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे एपीआय सचिन वाझे यांचा अंतरिम जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. अखेर एनआयएने त्यांना अटक केली. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात त्यांच्या पत्नीने सचिन वाझे यांनीच आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे एपीआय सचिन वाझे हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले. या प्रकरणात सचिन वाझे यांनी ठाणे न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र ठाणे सत्र न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन तात्पुरत्या काळासाठी फेटाळला आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी 19 तारखेला ठेवण्यात आलेली आहे.
दरम्यान, विशेष म्हणजे एनआयएच्या आधी 12 तारखेला एटीएसनेही सचिन वाझे यांची चौकशी केली होती. दहशतवाद विरोधी पथका (ATS)ने सचिन वाझे यांची तब्बल दहा तास चौकशी केली होती. मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही, मी धनंजय गावडेंना ओळखतही नाही, अशी माहिती सचिन वाझेंनी एटीएसला दिली होती.