शिळफाटा येथील रस्ता दुरुस्तीसाठी बंद
ठाणे | महापे-शिळफाटा मार्गावरील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) रस्त्याच्या दुरुस्तीचे काम शुक्रवार, ४ मार्चपासून पुढील पंधरा दिवसांसाठी हाती घेण्यात आले. त्यामुळे महापे-शिळफाटा मार्गावर वाहनांचा भार वाढून वाहतूक कोंडीची शक्यता वर्तविली जात आहे.
महापे- शिळफाटा मार्गावरील एमआयडीसी रस्त्यावरून कल्याण -डोंबिवली, अंबरनाथ या भागातील हजारो वाहने नवी मुंबई, महापेच्या दिशेने जात असतात. गेल्या काही महिन्यांपासून या एमआयडीसी मार्गावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गाच्या दुरुस्तीचे काम एमआयडीसीकडून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे ही मार्गिका शुक्रवार, ४ मार्चपासून पुढील पंधरा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे. येथील वाहतूक कल्याण-शिळफाटा या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
ल्ल कल्याण, पनवेलकडुन कल्याणफाटा येथून एमआयडीसीमार्गे हॉटेल पूजा पंजाबकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कल्याणफाटा- फॉरेस्ट नाका येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने कल्याणफाटा येथे उजवे वळण घेऊन शिळफाटय़ामार्गे किंवा पनवेलकडुन येणारी वाहने कल्याणफाटा येथून सरळ जाऊन शिळफाटय़ामार्गे इच्छित स्थळी जातील.