‘राज ठाकरेंनी महायुतीत येऊ नये’, रामदास आठवलेंनी सांगितले यामागचे नेमके कारण

Ramdas Athawale : महायुतीला लोकसभेतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत प्रचंड मोठा विजय मिळवला. सध्या महायुतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) आणि रामदास आठवले यांच्या आरपीआय (आठवले गट) पक्षासह अनेक छोट्या पक्षांचाही समावेश आहे. आता महायुतीमध्ये मनसे देखील सहभागी होणार का?अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. मात्र, महायुतीचा भाग असलेल्या आरपीआय पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी राज ठाकरेंनी महायुतीत येऊ नये अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
आठवले यांनी ‘राज ठाकरे आमचे चांगले मित्र आहेत. पण त्यांनी महायुतीत येऊ नये. महायुतीत आल्यानंतर आम्हाला काही मिळणार नाही’, असे म्हटले आहे.
पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष देखील महायुतीमध्ये सहभागी होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – राज ठाकरे भेट, उदय सामंत-राज ठाकरे भेटीनंतर या चर्चेने अधिकच वेग पकडला आहे. आता यावर रामदास आठवले यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
रामदास आठवले म्हणाले की, ‘मनसे महायुतीत येईल, अशी चर्चा सध्या सुरु आहे. राज ठाकरे आमचे चांगले मित्र आहेत. मात्र राज ठाकरे यांनी महायुतीत येऊ नये.’ यामागचे कारण सांगताना ते म्हणाले की, आम्हाला आत्ताच काही मिळत नाही. राज ठाकरे आल्यावर काहीच मिळणार नाही. लोकसभेत त्यांचा काही फारसा फायदा आम्हाला झालेला नाही.
‘लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीने मला डावललं. मात्र मी महायुतीला डावललं नाही. त्यांना ज्या प्रकारे आपल्या पक्षातील नेते आणि कार्यकर्ते सांभाळावे लागतात, अगदी त्या प्रकारे मला देखील माझे कार्यकर्ते सांभाळावे लागतात. त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत आम्हाला जागा देण्यात यावी.’, असेही ते म्हणाले.
आगामी महापालिका निवडणुकांमध्ये 10 ते 12 जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत. महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवेल असं वाटतं नाही. मात्र, महायुतीने एकत्र निवडणूक लढवली पाहिजे, असे ते म्हणाले.