मुंबईत पावसाचा कहर सुरूच, मध्य रेल्वेची लोकल सेवा पुन्हा मंदावली
मुंबई – गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने आज तिसऱ्या दिवशीही मुंबईला झोडपले. रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने सकाळी चांगलाच जोर धरला. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते नाहूर स्टेनश दरम्यान रेल्वे रुळावर पाणीच पाणी झाले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरून लोकल तब्बल 20 मिनिटे उशिराने धावत आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर निघालेल्या चाकरमान्यांचा खोळंबा झाला असून पाऊस, लोकलचा खोळंबा आणि त्यामुळे झालेली गर्दी यामुळे चाकरमानी वैतागले आहेत.
मुंबईत जोरदार पाऊस सुरू असल्याने मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. अनेक झोपडपट्ट्या आणि सोसायट्यांमध्येही पाणी साचले आहे. मुंबईतील सखल भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे. तर दुसरीकडे विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप या स्टेशनवर रेल्वे रुळावर पहाटे पाणी साचले होते. परिणामी 20 मिनिटे मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावरील पाण्याचा तातडीने उपसा केला आहे. त्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. तरीही आता मध्य रेल्वे 20 मिनिटे उशिराने धावत आहे. तर हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे, अशी माहिती मध्य रेल्वेची जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.