आता दुभाजकांच्या रंगरंगोटीचा घाट; मुंबई महापालिका निवडणुकीसाठी बेगमी
![Now the colorful ghats of the dividers; Begum for Mumbai Municipal Corporation elections](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/mv-bmc-1.jpg)
मुंबई | मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा लवकरच अपेक्षित असून तत्पूर्वी मोठ्या प्रमाणांवर विविध कामे हाती घेण्याचा सपाटा प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेने लावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुरक्षिततेचे कारण पुढे करीत प्रशासनाने मुंबईमधील दुभाजक, पदपथांच्या कडेच्या दगडांची रंगरंगोटी करण्याचा घाट घातला आहे. त्याचबरोबर प्रमुख रस्त्यांच्या आजूबाजूच्या भिंतींवर कलात्मक चित्रे रंगवून त्या सुशोभित करण्यात येणार आहेत.
रस्त्यांवरील दृश्यमानता वाढावी, पर्यायाने वाहनचालकांना सुरक्षितरितीने वाहन चालविता यावे आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, रस्ते परिसरांचे सुशोभीकरण व्हावे यादृष्टिने वेगवेगळ्या उपाययोजना करण्याचे निर्देश पर्यटन, पर्यावरणमंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका बैठकीवेळी दिले होते. त्यानुसार महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी सर्व प्रशासकीय विभाग कार्यालयांना सूचना केल्या. रस्त्यांवरील मध्यवर्ती दुभाजकांची स्वच्छता करुन नव्याने रंगरंगोटी करणे, दुभाजक अस्तित्वात नसल्यास शक्य त्या रस्त्यांवर दुभाजक बांधणे, दुभाजकांमध्ये हिरवळ वा फुलझाडांची लागवड करणे, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण करणे, प्रमुख रस्त्यांवरील आजुबाजूच्या भिंतीवर कलात्मक रंगरंगोटी करणे, चित्रं रेखाटणे इत्यादी कामे हाती घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार सध्या मुंबई ठिकठिकाणी ही कामे सुरु आहेत. विभाग कार्यालयांच्या वतीने ही कामे हाती घेण्यात आली आहेत.
पालिकेच्या विभाग कार्यालयांमार्फत प्रमुख रस्त्यांच्या आजुबाजूला असणाऱ्या भिंतीची कलात्मकरितीने रंगरंगोटी करण्यात येत आहे. रस्त्यांवरील पदपथ व वाहतूक बेटांचे सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. प्रमुख रस्त्यांवरील मध्यवर्ती दुभाजक व पदथाच्या कडेला असणारे दगड रंगवण्यात येत आहेत.