मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प ३ फेब्रुवारीला सादर होणार
![Mumbai Municipal Corporation budget will be presented on 3rd February](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/856639-bmc-istock-080719.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल २०२२-२३ या वर्षाचा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ३ फेब्रुवारीला स्थायी समितीला सादर करणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यात थेट करवाढ होण्याची शक्यता नसली तरी महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सेवांच्या शुल्कात वाढ करण्याची शिफारस केली जाऊ शकते. अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात यावेळी ७ ते ८ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी महापालिकेने ३९ हजार ३८ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. यावेळी वरळी ते नरिमन पॉइंट कोस्टल रोड, मुलुंड-गोरेगाव जोड रस्ता आणि समुद्राचे पाणी गोडे करणारा प्रकल्प यांचा समावेश असल्यामुळे त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. कोस्टल रोडचे काम सुरू आहे. मात्र पुढील आर्थिक वर्षात पाणी गोडे करण्याचा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. याशिवाय मुलुंड-गोरेगाव जोड रस्त्याच्या भुयारी मार्गाचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी पालिका अर्थसंकल्पात तरतूद करण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करून आरोग्य विभागासाठी पालिका मोठी तरतूद करण्याची शक्यता आहे. त्यात दवाखान्यांच्या विस्तारावर भर दिला जाणार आहे. मुलुंडमधील अग्रवाल, विक्रोळीतील महात्मा फुले आणि गोवंडीच्या शताब्दी या रुग्णालयांच्या विस्तारावर भर दिला जाण्याची शक्यता आहे.