१०० हून अधिक लसीकरण केंद्रे बंद ; लसीकरणाचा जोर कमी झाल्यामुळे पालिकेचा निर्णय
![More than 100 vaccination centers closed; Decision of the municipality due to reduced emphasis on vaccination](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/covid-vaccine-1.jpg)
फेब्रुवारीपासून तिसरी लाट ओसरायला सुरुवात झाली, तशी केंद्रावरील गर्दीही कमी होऊ लागली
मुंबई | मुंबईत करोनाची तिसरी लाट ओसरल्यामुळे लसीकरणाचा जोरही कमी झाला आहे. त्यामुळे आता पालिकेने सुमारे १०० हून अधिक लसीकरण केंद्रे बंद केली आहेत. शहरात सध्या १९४ केंद्रे सुरू आहेत.करोनाची दुसरी लाट सुरू असताना लसीकरणासाठी केंद्रांवर रांगा लागत होत्या. तेव्हा केंद्रावरील भार कमी करण्यासाठी व नागरिकांना घराजवळच लसीकरण सुविधा उपलब्ध करण्यासाठी पालिकेने प्रत्येक विभागात लसीकरण केंद्रे सुरू केली. याचाच फायदा घेत काही नगरसेवकांनीही त्यांच्या विभागांमध्ये केंद्रे उभारली. त्यामुळे शहरात ३५० लसीकरण केंद्रे सुरू होती.
फेब्रुवारीपासून तिसरी लाट ओसरायला सुरुवात झाली, तशी केंद्रावरील गर्दीही कमी होऊ लागली. फेब्रुवारीमध्ये शहरात पालिकेची २८६ लसीकरण केंद्रे कार्यरत होती. या केंद्रांमध्ये ३७७ लसीकरण कक्ष चालविले जात होते. या केंद्राची दरदिवशी सुमारे ५६ हजार ६०५ जणांचे लसीकरण करण्याची क्षमता असून परंतु प्रत्यक्षात या केंद्रामध्ये दरदिवशी २० हजार जणांचे लसीकरण केले जात होते. त्यामुळे लसीकरण केंद्रावरील मनुष्यबळ आणि संसाधनाचा अपव्यय होत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने १९ फेब्रुवारीला प्रसिद्ध केले होते.
मार्च महिन्यापासून शहरातील करोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात कमी झाला असून सध्या शहरात ४२१ रुग्ण उपचाराधीन आहेत. परिणामी, लसीकरणाचा जोरही ओसरला असून सध्या दिवसाला जवळपास १० ते ११ हजार जणांचे लसीकरण केले जात आहे. त्यामुळे पालिकेने सुमारे ३०० केंद्रापैकी १०० हून अधिक केंद्रे बंद केली आहेत. सध्या शहरात १९४ केंद्रे सुरू असून यामध्ये ३४३ लसीकरण कक्ष चालविले जात आहेत. या केंद्रांमध्ये दरदिवशी सुमारे ३९ हजार जणांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. सध्या पालिकेने मोबाइल लसीकरण केंद्रावर अधिक भर दिला आहे.
आमच्याकडे ११ लसीकरण केंद्रे होती. सध्या फारच कमी प्रतिसाद असल्यामुळे यातील आठ केंद्रे सुरू ठेवली आहेत. अजून दोन केंद्रे बंद करण्यात येणार असून सहा केंद्रे सुरू ठेवली जाणार आहेत, असे चेंबूर पश्चिम विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. भूपेंद्र पाटील यांनी सांगितले.
लसीकरणासाठी फारशी गर्दी नसल्यामुळे पालिकेच्या सूचनेनुसार दोन केंद्रांचे मिळून एक केंद्र केले आहे. आधी आमच्याकडे नऊ केंद्रे होती. त्याऐवजी सध्या पाच केंद्रे चालवली जात आहेत. यातील एक मोबाइल लसीकरण केंद्र असून आवश्यकतेनुसार ज्येष्ठ नागरिक किंवा अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींच्या लसीकरणासाठी पाठविले जाते. यातील तीन केंद्रावर सामाजिक संस्थेमार्फत कार्यरत असलेले मनुष्यबळ काम करीत असल्यामुळे सध्या एकाच केंद्राचा भार पालिकेवर आहे. यातील चार केंद्रेच सुरू ठेवण्यात येणार आहे. – प्रशांत गायकवाड, सहाय्यक आयुक्त, डी’ विभाग कार्यालय