महाराष्ट्रालाही तौतेचा फटका बसला, मग पंतप्रधानांचा भेदभाव का?- नवाब मलिक
![Maharashtra was also hit by the parrot, then why is the Prime Minister discriminated? - Nawab Malik](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/nawab-malik.jpg)
मुंबई |
देशातल्या काही ठिकाणी तौते वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातल्या नुकसानीचीही पाहणी का केली नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी याबद्दल ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दमण, दीव आणि गुजरात परिसरात तौते वादळाने केलेल्या नुकसानीही पाहणी करत आहेत. तसंच महाराष्ट्रातल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी ते का करत नाहीत? हा सरळ सरळ भेदभाव नाही का?”
Today PM Modi ji is taking an ariel survey of #CycloneTauktae affected areas of Daman, Diu and Gujarat.
Why not the same of the areas affected in #Maharashtra ?
Is this not clear cut discrimination ?— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) May 19, 2021
दोन राज्यांत धुमाकूळ घालणाऱ्या तौते चक्रीवादळामुळे कोकणात जास्त नुकसान झाले. गेल्या वर्षी जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळात कोकणला मोठा फटका बसला होता. त्या धक्क्यातून कोकण सावरत असतानाच आलेल्या तौते चक्रीवादळाने पावसाळ्याच्या तोंडावर हजारो कुटुंबांना बेघर केले असून, फळबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान केले आहे.अरबी समुद्रातील तौते चक्रीवादळात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून, ३१ जण जखमी झाले आहेत. चक्रीवादळाचा कोकणातील ३,५७१ गावांतील दोन लाख २० हजार जणांना फटका बसला असून, आठ हजार ८३० हेक्टरवरील शेतपिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. पुणे विभागातही घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी करून परिस्थितीचा आढावा घेतला. चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी किनारपट्टी भागात के लेली तयारी, मुंबईतील परिस्थिती आदींबाबत मोदी यांनी माहिती विचारली. त्यावर ठाकरे यांनी राज्य सरकारने केलेल्या सज्जतेची माहिती दिली आणि राज्य सरकार परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असल्याचे सांगितले.तर गुजरातमध्ये दोन दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज त्याची तीव्रता आणखी कमी होऊन कमी दाबाच्या पट्टय़ात रूपांतर होणार आहे. मात्र, या काळात थेट राजस्थानपर्यंत त्याचा परिणाम दिसून येणार आहे. दक्षिण राजस्थानमध्ये आज जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गुजरातमधून सुमारे दोन लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.