राज्यात जानेवारीत ७ हजार बेरोजगारांना नोकऱ्या; ९४ हजार उद्योगांची मनुष्यबळासाठी मागणी
![Jobs for 7,000 unemployed in the state in January; Demand for manpower of 94,000 industries](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/Job.jpg)
मुंबई | करोनाच्या संकटामुळे रोजगाराची समस्या निर्माण झाली असतानाच, आता राज्यातील खासगी, सार्वजनिक अशा जवळपास ९४ हजार उद्योगांनी मनुष्यबळ मागणीसाठी राज्याच्या कौशल्य विकास व उद्योजगता विभागाकडे नोंदणी केली आहे. त्यातून चालू वर्षांच्या प्रारंभालाच म्हणजे जानेवारी महिन्यात सात हजारांहून अधिक बेरोजगारांना विविध उद्योगांमध्ये रोजगाराची संधी मिळाली आहे.
राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाच्या वतीने महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे इत्यादी उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत आहे. अशा विविध उपक्रमांमधून मागील वर्षी मध्ये राज्यात २ लाख १९ हजार व त्या आधी २०२० मध्ये १ लाख ९९ हजार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
या विभागाने नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगारांसाठी तसेच कुशल मनुष्यबळाच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योगांसाठी https:// rojgar. mahaswayam. gov. in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. त्यानुसार या विभागाकडे तसेच महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९४ हजार ३४५ इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. उद्योजक त्यांच्याकडील पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करीत आहेत. नव्या वर्षांत जानेवारी महिन्यात विभागाकडे २५ हजार ९८१ इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोदणी केली आहे.