अनिल देशमुख यांच्या मालमत्तेवर टाच, 4 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त
मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली असून 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. 100 कोटी खंडणी प्रकरणात ही कारवाई झाली असून यामुळे देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अनिल देशमुख यांच्या वरळीतील फ्लॅट आणि उरणमधील धुतुम गावातील जमीन जप्त केली आहे. ईडीने देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण देशमुख यांनी प्रकृतीचं कारण देऊन ते चौकशीला हजर राहीले नव्हते. ईडीने देशमुखांच्या दोन सचिवांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे ईडीने देशमुख यांची मालमत्ता जप्त केली आहे.
येत्या काळात अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी काळात ईडीकडून अनिल देशमुख आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांची चौकशी केली जाऊ शकते. ईडीने देशमुख यांच्या पत्नीला समन्स बजावले होते. पण देशमुखांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याने अद्याप चौकशी झालेली नाही.




