सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, पोलिसांनी सुरक्षा वाढवली
घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला
![Firing outside Salman Khan's house, police increased security](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Salman-khand-780x470.jpg)
मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचं सांगितलं जात आहे. सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पहाटे ४.५१ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
सलमानच्या घराबाहेर दोन अज्ञातांनी चार फायर राऊंड केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वांद्रे पोलीस, गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या विविध टीम सध्या घटनास्थळी तपास करत आहेत. याशिवाय पोलीस या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासत आहेत.
यापूर्वी २०२२ मध्ये सलमान खानचे वडील घराबाहेर जॉगिंग करत असताना त्यांना चिठ्ठीद्वारे धमकी देण्यात आली होती. यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. पुढे नोव्हेंबर २०२३ मध्ये त्याला धमकीचा ईमेल आला होता. याशिवाय कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अशातच पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडल्याने गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, सलमानच्या घराबाहेर सद्या मुंबई पोलीस, क्राइम ब्रँच आणि एटीएसची टीम पुढील तपास करत आहे. गॅलेक्सीबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला असून हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करून पळ काढला आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही.