वरळी लिफ्ट दुर्घटना प्रकरणी सुपरवायझरसह कंत्राटदार अटकेत
मुंबई – वरळीतील हनुमान गल्ली येथे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत लिफ्ट कोसळून पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी घडली होती. या प्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात कलम 304(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी याप्रकरणी सुपरवायझर आणि कंत्राटदाराला अटक केली.
वरळी येथील बीडीडी चाळ क्रमांक 119 समोर असणार्या ललित अंबिका विकासक यांच्याकडून बांधकाम करण्यात आलेली लक्ष्मी को.ऑप.हौसिंग सोसायटीच्या वाहन पार्किंग बांधकामाच्या येथील लिफ्ट काल सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास 17 व्या मजल्यावरून कोसळून दुर्घटना घडली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत मदतकार्य केले. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला होता. तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला. या दुर्घटनेप्रकरणी रात्री ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात साईट सुपरवायझर आणि कंत्राटदाराविरुद्ध मजुरांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांना रात्री उशिरा अटक करण्यात आली अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी दिली.