Mission Vidhan Sabha Elections: राज्यात विधानसभा निवडणूक कार्यक्रम उद्या घोषित होण्याची शक्यता!
आज सर्वपक्षीय प्रतिनिधींशी चर्चा : 15 ते 17 नोव्हेंबरपर्यंत मतदान, २० नोव्हेंबरला निकाल?

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वातील केंद्रीय निवडणूक आयोगाचे 14 जणांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. हे पथक पुढील शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस केंद्रीय पथक राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहे.
निवडणूक आयोगाचे पथक आज विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करणार आहे. त्यानंतर दुपारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी व नोडल ऑफिसर यांची बैठक घेईल. तसेच गुप्तचर व विविध अंमलबजावणी संस्थांच्या अधिकाऱयांकडून माहिती घेतली जाईल. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता राज्याचे मुख्य सचिव, राज्याचे पोलीस महानिरीक्षक, प्रशासकीय विभागाचे विविध सचिव आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतील. शनिवारी केंद्रीय निवडणूक पथकाची राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व जिह्यांतील पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्यासोबत बैठक होईल. प्रशासनाची प्रशासकीय तयारी, पोलीस अधिकाऱ्यांकडून कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती आणि निवडणूक अधिकाऱयांकडून माहिती, आढावा घेतल्यानंतर आयोगाचे पथकाची पत्रकार परिषद होईल. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता हे पथक दिल्लीकडे रवाना होईल.
निवडणुकीचा कार्यक्रम असा असेल…
महाराष्ट्रात 15 ते 17 नोव्हेंबरदरम्यान मतदान आणि 20 नोव्हेंबरपर्यंत निकाल असा कार्यक्रम असेल अशी शक्यता निवडणूक कार्यालयातील अधिकाऱयांकडून व्यक्त केली जात आहे.