“लवंगी फटाका की, बाॅम्ब लवकरच स्पष्ट होईल”; देवेंद्र फडणवीसांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर
![Writing a letter to the Prime Minister is the biggest help to the state - Fadnavis](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/fadanvis.jpg)
मुंबई – विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेमध्ये गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय घटना आणि गृहमंत्र्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप या संदर्भातील एक निवेदन राज्यपालांना दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
वाचा :-फडणवीस दिल्लीला बॉम्ब घेऊन आले, पण तो वात नसलेला लवंगी फटाका निघाला; संजय राऊतांची खोचक टीका
महाविकास आघाडी सरकारला प्रश्न विचारण्याचे आणि मुख्यमंत्र्यांना या संदर्भात नेमकी काय कारवाई केली, याचा अहवाल मागवण्याचे पूर्ण अधिकार राज्यपालांना आहेत. त्यामुळे आम्ही राज्यपालांना विनंती केली की, मुख्यमंत्री बोलत नसतील तर त्यांना तुम्ही बोलतं करावं. मुख्यमंत्र्यांसह सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील या भाजपच्या नेत्यांचीही यावेळी उपस्थिती होती.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करत त्यांनी गृह सचिवांना दिलेला अहवाल हा लवंगी फटाका असल्याचं आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं. यावर फडणवीसांनी मी सादर केलेला अहवाल लवंगी फटाका आहे की, बॉम्ब? हे लवकरच स्पष्ट होईल. असं सडेतोड प्रत्युत्तर संजय राऊत यांना दिलं आहे.
लेटरबॉम्ब प्रकरणानंतर महाराष्ट्रात राजकीय टीकाटिप्पणीला चांगलंच उधाण आलं आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवत सरकारने सर्व नैतिकता पायाखाली तुडवली असल्याचं आणि सत्तेसाठी हे सर्व चालत असल्याचं बोलून दाखवलं.