रेल्वेत मोबाइल चोरांना ऊत ; पाच दिवसांत १६९ मोबाइल लंपास
![Cell phone thieves in the train; 169 mobile lumpas in five days](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/mobile-thefts-1.jpg)
मुंबई : गणेशोत्सवकाळात मुंबई महानगरात लोकल तसेच मेल, एक्स्प्रेस गाडय़ांना वाढलेल्या गर्दीचा फायदा घेऊन चोरांकडून मोबाइल लंपास करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या पाच दिवसांत मुंबई विभागात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर १६९ मोबाइल चोरीला गेले आहेत.
लोकल प्रवासात गर्दीच्या वेळी चोरांकडून प्रवाशांच्या मोबाइलवरच हात मारला जातो. चार ते पाच जणांच्या टोळक्याकडून प्रवाशाला बोलण्यात किंवा भांडणात गुंतवून प्रवाशाचा मोबाइल लंपास केला जातो. गेल्या पाच दिवसांत गणेशोत्सवानिमित्त खरेदीसाठी बाहेर पडणारे, मेल, एक्स्प्रेस गाडय़ांनी बाहेरगावी जाणाऱ्यांबरोबरच कार्यालयीन आणि अन्य कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त होती. याच गर्दीचा फायदा घेऊन चोरांनी मोबाइलवर हात मारल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. २६ ऑगस्ट रोजी ३७, २८ ऑगस्ट रोजी ३४, २९ ऑगस्ट रोजी ३१, ३० ऑगस्ट रोजी ३७, तर ३१ ऑगस्ट रोजी ३० मोबाइल चोरीला गेले आहेत. यामध्ये मोबाइलच्या जबरी चोरीच्याही घटना घडल्या आहेत. दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, कल्याण, वांद्रे, अंधेरी, बोरीवली, कांदिवली, नालासोपारा, वाशी, वडाळा या स्थानकांत मोबाइल चोरी अधिक होते. मोबाइल चोरीबरोबरच, पाकीट आणि बॅगचोरीचेही प्रमाण जास्त असल्याचे लोहमार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले.