उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखावटा

मुंबई : उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना बुधवारी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपाचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
महत्त्वाचे म्हणजे तीन दिवसांपूर्वीही रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त होते. मात्र, रतन टाटा यांनी स्वत: सोशल मीडियावर एक निवेदन जारी करत यासंदर्भात खुलासा केला होता. ही बातमी अफवा असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटलं होतं. माझ्या वयामुळे आणि वैद्यकीय कारणांमुळे सध्या माझी वैद्यकीय तपासणी सुरु आहे, असेही त्यांनी सांगितलं होतं. मात्र, काल दुपारपासून त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालात दाखल करण्यात आले होते. मात्र रात्री उशीरा त्यांचे निधान झालं.
ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज (गुरुवार १० रोजी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे.
रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत.
रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.





