‘एसटी’च्या सेवेत लवकरच ९०० वातानुकूलित ‘मिडी बस’ ; महामंडळाच्या बैठकीत आज प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता
मुंबई : एसटी महामंडळाच्या ताफ्यात विजेवर धावणाऱ्या वातानुकूलित दोन हजार बस दाखल होणार आहेत. यापैकी सुमारे ९०० मिडी बस वातानुकूलित असल्याची माहिती महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महामंडळाच्या संचालक मंडळाची उद्या, शुक्रवार बैठक होणार आहे. या वेळी नवीन सीएनजी वाहनांऐवजी दोन हजार डिझेलवर धावणाऱ्या आणि दोन हजार विजेवर धावणाऱ्या बस घेण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडला जाणार असून त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मंजुरी मिळाल्यास लवकरच मिडी बसही प्रवाशांच्या सेवेत येतील.
नवीन बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. मिडी बस शहर ते ग्रामीण भागात चालवतानाच काही बस फक्त ग्रामीण भागातील प्रवाशांसाठीच चालवण्याचे नियोजन आहे. तिचे भाडे प्रवाशांना परवडणारे असेल, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. या बस १२ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. वातानुकूलित मिडी बसची प्रवासी क्षमता ३२ आसनी आहे.





