ताज्या घडामोडीमुंबई

सहा हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर

मुंबई | मुंबई महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत विजयी होऊन सभागृहात दाखल झालेल्या नगरसेवकांची मुदत सोमवारी संपुष्टात आली. अखेरच्या दिवशी स्थायी समितीची बैठक आयोजित करून सत्ताधारी शिवसेनेने तब्बल सहा हजार कोटी रुपयांच्या ३७० पैकी बहुतांश प्रस्ताव मंजूर केले.

नियमबाह्य पद्धतीने सादर केलेले प्रस्ताव मंजूर करू नये अशी मागणी करीत भाजपने बैठकीत आक्षेप घेतला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करणारे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी करीत भाजप नगरसेवकांनी गोंधळ घातला. तर शिवसेना नगरसेवकांनीही प्रत्युत्तरादाखल घोषणाबाजी केली. परिणामी, गोंधळात अवघ्या २५ मिनिटांमध्ये बैठक गुंडाळण्यात आली.

विद्यमान पालिका सभागृहाची मुदत संपुष्टात येत असताना, शेवटच्या दिवशी स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या बैठकीची कार्यक्रम पत्रिका शुक्रवारी प्रसारित झाली. त्यामध्ये नाले दुरुस्ती, संरक्षक भिंतीची उभारणी, रुंदीकरण, खोलीकरण, रुग्णालये आदी विविध कामांच्या १६० प्रस्तावांचा समावेश होता. मात्र बैठकीपूर्वी आणखी १०३ प्रस्ताव कार्यक्रमपत्रिकेमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. त्याशिवाय पूर्वीच्या बैठकांमधील अनिर्णित प्रस्तावही या बैठकीत विचारात घेण्यात आले होते. त्यामुळे प्रस्तावांची एकूण संख्या ३७० वर पोहोचली होती. साधारण सहा हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचे हे प्रस्ताव होते.

स्थायी समितीची बैठक सुरू होताच भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्याची परवानगी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे मागितली. मात्र कामकाजानंतर हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्यास परवानगी देण्यात येईल, असे स्पष्ट करून त्यांनी प्रस्ताव पुकारण्यास सुरुवात केली. अध्यक्षांच्या या पवित्र्यामुळे संतप्त झालेल्या भाजप नगरसेवकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यशवंत जाधव चोर है, भ्रष्ट है, शिवसेना हाय हाय अशा घोषणा देत भाजप नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यावर शिवसेनेच्या नगरसेवकांनीही प्रत्युत्तर देत घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळातच जाधव यांनी बहुतांश प्रस्तावांना मंजुरी दिली. चर्चेविना मंजूर करण्यात आलेल्या या प्रस्तावांबाबत तक्रार करण्यासाठी भाजप नगरसेवकांनी आयुक्तांकडे धाव घेतली. घोषणाबाची करीत नगरसेवकांनी पालिका मुख्यालय दणाणून सोडत नगरसेवकांनी आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

आयुक्तांनी कठोर पावले उचलावी – भाजप

स्थायी समितीमध्ये सादर झालेल्या प्रस्तावात अनेक त्रुटी होत्या. या प्रस्तावांवर चर्चा करण्यास अध्यक्षांनी परवानगी दिली नाही. काही प्रस्ताव रविवारी रात्री पाठविण्यात आले होते. या प्रस्तांना मंजुरी दिल्यामुळे मोठा भ्रष्टाचार होणार आहे. असे प्रस्ताव मंजूर न करता आयुक्तांनी प्रशासक कठोर पावले उचलावी, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली. आयुक्तांना विशेष अधिकार आहेत. त्यांनी त्याचा वापर करावा आणि भ्रष्टाचार रोखावा, असे ते म्हणाले.

मुंबईच्या विकासासाठी प्रस्तावांना मंजुरी

शिवसेना कायमच मुंबईकरांचे हित लक्षात घेऊन विकासकामे करीत आहे. मुंबईमधील विविध विकासकामांचे प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्यात आले होते. पालिका सभागृहाची मुदत सोमवारी संपुष्टात येणार होती. त्यामुळे या प्रस्तावांना तातडीने मंजुरी देणे क्रमप्राप्त होते, असे यशवंत जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button