शिवसेनेचा आमदार फोडायची कोणाची हिंमत नाही : संजय राऊत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/Raut.jpg)
मुंबई । ऑनलाईन टीम । महाईन्यूज ।
‘शिवसेनेचे आमदार फोडण्याची कोणाची हिंमत नाही’ अशी रोखठोक प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेनेची आज ‘मातोश्री’वर सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीनंतर सर्व आमदारांना अज्ञात स्थळी नेलं जाणार असे बोलले जात आहे. यावर आपली प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. दरम्यान महाराष्ट्रात सेनेचाच मुख्यमंत्री येणार असा पुनरुच्चाही राऊत यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले, ज्यांच्याकडे 145 आकडा आहे, त्यांनी सरकार स्थापन करावे असे आव्हान पुन्हा राऊत यांनी भाजपला दिले आहे. तसेच शिवसेनेच्या आमदारांच्या आसपास फिरकायची कोणाची हिंमत नाही. आमचे आमदार निष्ठावान आहेत. आमचे आमदार फुटणार नाहीत याची आम्हांला खात्री आहे. त्यांच्याशी संपर्क करण्याची हिमंत कोणाची नाही. राज्यात सध्या आमदार फोडाफोडीच्या गोष्टी होत असतात. अनेक राज्यांमध्ये अशा गोष्टी झाल्या आहेत. पण महाराष्ट्रात आम्ही अशा गोष्टी होऊ देणार नाही, असंही ते म्हणाले. दरम्यान, आजच्या बैठकीबद्दल बोलताना ते म्हणाले, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत.