राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांना शरद पवार देणार कानमंत्र
पराभूत उमेदवारांसोबत मुंबईत बैठक; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची उपस्थिती
मुंबई |प्रतिनिधी
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्वच उमेदवारांना खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार कानमंत्र देणार आहेत. पराभूत उमेदवारांची मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटर येथे ही बैठक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसक़़डूनच ही बैठक बोलवण्यात आली आहे. मुंबईतील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, राजेश टोपे अशा बड्या नेत्यांची आणि काही महत्त्वाच्या मंत्र्यांचीही या बैठकीला उपस्थिती असणार आहे.
शिवसेना, भाजप, काँग्रेस या पक्षांप्रमाणंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आता राष्ट्रवादीनंही मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. पराभूत उमेदवारांना या बैठकीच बोलवत स्थानिकांचे प्रलंबित प्रश्न आणि पराभवाच्या कारणांवर चर्चा करत त्यावर सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शिवाय प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भातही पवार मार्गदर्शन करणात आहेत. आगामी निवडणुकांसाठी पक्षाची तयारी कशी असणं अपेक्षित आहे याबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.





