“मुंबई लोकल नेमकी कधी सुरू होणार”; पीयूष गोयल यांनी दिलं उत्तर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Capture-18.jpg)
सर्वांचे लक्ष लागलेली मुंबई लोकल नेमकी कधी सुरू होणार या प्रश्नाचं उत्तर अखेर केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिलं आहे. ‘अनलॉक’चा पाचवा टप्पा उद्यापासून सुरू होणार असून हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार उघडणार आहेत. मात्र, मुंबई लोकल कधी सुरू होणार याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे. ‘राज्य सरकारनं मागणी केल्यानंतरच आम्ही त्याबाबत निर्णय घेऊ,’ असं गोयल यांनी स्पष्ट केलं आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊननंतर राज्य सरकारनं ‘पुनश्च हरिओम’ केले आहे. टप्प्याटप्प्यानं अनेक गोष्टी खुल्या करण्यात आल्या आहेत. मात्र, सर्वांना प्रतीक्षा आहे ती मुंबई लोकलची. मुंबई उच्च न्यायालयानं या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. मुंबई उपनगरचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील राज्य सरकार ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मुंबई लोकल सुरू करण्याचा विचार करत असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, प्रत्यक्षात राज्य सरकारनं अद्याप केंद्र सरकारकडं याबाबत कुठलीही मागणी केलेली नाही, असं पीयूष गोयल यांनी आज स्पष्ट केलं.
नव्या कृषी कायद्याबाबत माहिती देण्यासाठी गोयल यांनी मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना मुंबई लोकलविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ‘मुंबई लोकल सुरू करण्यासाठी राज्य सरकारचा अजून प्रस्ताव आलेला नाही. जोर्यंत राज्य सरकार प्रस्ताव पाठवत नाही, तोपर्यंत आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. याआधीही आम्ही हे स्पष्ट केलं आहे.’