माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचे निधन
![Former Justice PB Sawant passes away](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/PB-Sawant-1.jpg)
पुणे – माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचे आज निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. पुण्यात राहत्या घरी सकाळी साडे नऊ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या मंगळवारी सकाळी बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पुण्यातील पहिली एल्गार परिषद पी बी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. तसेच न्यायमूर्ती म्हणून त्यांनी अनेक ऐतिहासिक निकाल दिले होते. अतिशय कडक शिस्तीचे न्यायमूर्ती अशी त्यांची ओळख होती.
पी बी सावंत यांचा जन्म 30 जून 1930 रोजी झाला. मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी (एलएलबी) मिळवल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली म्हणून सराव सुरू केला. 1973 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या उल्लेखनीय कामांपैकी एक म्हणजे जून 1982 मधील एअर इंडिया विमान अपघाताची चौकशी. 1989 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात नियुक्त करण्यात आले. 1989 ते 1985 या काळात ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. 1995 मध्ये ते निवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यानंतर सामाजिक कार्यक्रमांमध्ये ते सक्रीय होते. वर्ल्ड प्रेस कऊन्सिल आणि प्रेस कऊन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिले. तसेच यादरम्यान लोकशासन आंदोलन पार्टीचे संस्थापक म्हणून मोठ्या प्रमाणावर त्यांनी काम केले होते. त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नेमण्यात आलेल्या समन्वय समितीचेदेखील ते सुरुवातीच्या काळात अध्यक्ष होते. मात्र मतभेद तसेच प्रकृतीच्या कारणामुळे नंतर त्यांनी जबाबदारी सोडली होती. गोध्रा दंगलीप्रकरणी स्थापित तीन सदस्यीय ट्रिब्युनलचेदेखील ते सदस्य होते.