भाजपाचा ‘रक्षाबंधन’ उपक्रम; कोविड योद्ध्यांना राख्या बांधणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/images-12.jpg)
मुंबई – यंदा भाजपाच्यावतीने आगामी रक्षाबंधन सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. त्यासाठी खास ‘रक्षाबंधन उपक्रम’ राबविला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत कोविड योद्धा डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस, माध्यम कर्मचारी आदींसाठी प्रत्येक घरातून दोन दोन राख्या आणि कृतज्ञता व्यक्त करणारी पत्रे जमा करून त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ नुकताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला.
मुंबई भाजपाने आयोजित केलेल्या या ‘रक्षाबंधन’ उपक्रम शुभारंभप्रसंगी मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक पोलीस स्थानक, स्थानिक रुग्णालय, सफाई चौकी, माध्यमांचे कार्यालय अशा ठिकाणी हा उपक्रम राबविला जाणार आहे.
तसेच जमा केलेल्या याच राख्या सीमेवर तैनात जवानांसाठी पाठविल्या जाणार आहेत. अशा राख्यांची पहिली पेटी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लडाखला रवाना करण्यात आली. नंतर आणखी पेट्या पाठविल्या जातील. त्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये सोसायट्या तसेच सार्वजनिक ठिकाणी भाजपातर्फे ‘रक्षाबंधन’च्या पेट्या ठेवल्या जाणार आहेत. तरी १ ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरातून दोन दोन राख्या या पेट्यांमध्ये जमा करण्यात याव्या, असे आवाहन मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.