बोटांच्या ठशांसोबत गुन्हेगारांच्या नेत्रपटलांचेही स्कॅन!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/eyes.jpg)
मुंबई – एखाद्या गुन्ह्य़ात आरोपीला अटक झाल्यानंतर बोटांचे ठसे घेतले जातात. आता यापुढे संबंधित आरोपीच्या बोटांच्या ठशांसोबत नेत्रपटलांचेही स्कॅन केले जाणार आहे. पश्चिम उपनगरांतील काही पोलीस ठाण्यांत ही पद्धत सुरू झाली आहे.
पथदर्शी स्वरूपातील हा प्रकल्प फक्त मुंबईतच नव्हे तर राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांत राबविला जाणार आहे. त्यामुळे कट्टर गुन्हेगारांबाबत तात्काळ माहिती मिळणे शक्य होणार असल्याचा दावा या घडामोडींशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला.
‘मल्टिमोडय़ुल बायोमेट्रिक आयडेन्टिफिकेशन सिस्टीम’मुळे (अॅम्बीस) हे शक्य होणार आहे. या पद्धतीमुळे केवळ नेत्रपटलच नव्हे तर आणखीही काही बाबी स्कॅन करणे शक्य होणार आहे. अशी स्कॅन केलेली माहिती सव्र्हरमध्ये साठविली जाणार असून त्यामुळे ती सहज उपलब्ध होऊ शकणार आहे. यासाठी गृह खात्याने ५५ कोटी मंजूर केले असून हळूहळू राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ही पद्धत कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असलेले स्कॅनर सर्व पोलीस ठाण्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ही सर्व पोलीस ठाणी सध्या संगणकांनी जोडण्यात आली आहेत. या नव्या पद्धतीमुळे कट्टर गुन्हेगारांबाबतची माहिती एका क्लिकवर आणि तीही काही सेकंदांत उपलब्ध होणार असल्याची माहितीही या अधिकाऱ्याने दिली.
बोटांच्या ठशांची माहितीही अशा पद्धतीने साठविण्यात आली होती. राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने साडेसहा लाख ठसे अशा पद्धतीने गोळा केले होते; परंतु २०१२ मध्ये सव्र्हर नादुरुस्त झाल्याने हा सर्व साठा पुसला गेला. त्यानंतर पुन्हा नव्याने माहिती गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
याआधी एका कागदावर ठसे घेऊन ते संगणकात साठविले जात होते. आता या नव्या पद्धतीमुळे थेट संगणकात ही माहिती साठविली जाणार आहे. ती अधिक अचूक असेल, असा दावाही केला जात आहे.