पेट्रोल 17 पैशांनी तर डिझेल 21 पैशांनी महाग

- निवडणूक झाल्याने दिलासाही गेला
नवी दिल्ली – कर्नाटक विधानसभा निवडणूक होताच इंधन दरापासून 19 दिवस मिळालेला दिलासाही संपला. सार्वजनिक इंधन कंपन्यांनी आज पेट्रोलच्या दरात लिटरमागे 17 पैशांची तर डिझेलच्या दरात लिटरमागे 21 पैशांची वाढ केली.
सार्वजनिक कंपन्यांनी दर वाढवल्याने डिझेलच्या किमतीने आजवरचा उच्चांक गाठला. तर पेट्रोलच्या किमतीने 56 महिन्यांची उच्चांकी पातळी गाठली. दरवाढीने देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर 74 रूपये 80 पैशांवर तर डिझेल लिटरमागे 66 रूपये 14 पैशांवर पोहचले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाचे दर वाढल्याने सार्वजनिक कंपन्यांनी मागील काही दिवस ग्राहकांना दिलेला दिलासा काढून घेतला.
याआधी 24 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येकी 13 पैशांनी वाढवण्यात आले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील दर वाढूनही आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रूपयाचे मूल्य आणखी घसरूनही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. सार्वजनिक कंपन्यांनी मान्य केले नसले तरी कर्नाटक निवडणुकीमुळेच ते स्थिर ठेवण्याचे पाऊल उचलण्यात आल्याचे स्पष्ट झाले. दर स्थिर ठेवण्याने या कालावधीत सार्वजनिक कंपन्यांना सुमारे 500 कोटी रूपयांचे नुकसान सोसावे लागले.





