दिवाळीनिमित्त गावी जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या जादा गाड्या
!["Withdraw the strike, otherwise ..."; Court order to ST employees](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/ST-Bus_1500530567280.jpg)
मुंबई – दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी एसटी सज्ज झाली आहे. राज्यातील वेगवेगळ्या आगारांतून दिवसाला 359 जादा बस सोडण्यात येणार आहेत. 24 ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या दहा दिवसांत 3,500 जादा बस प्रवाशांच्या सेवेत असतील.
दिवाळीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने जादा बस सेवेचे नियोजन केले आहे. त्यासाठी विभागनिहाय बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. एसटीने जादा बसच्या आरक्षणाची सुविधा प्रत्येक आगार, स्थानके, संकेतस्थळ आणि मोबाईल ऍपवरून उपलब्ध करून दिली आहे.
राज्यात रक्षाबंधनानंतर भाऊबिजेला प्रवाशांची संख्या सर्वाधिक असते. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी एसटीच्या इतर विभागांतील कर्मचाऱ्यांची “प्रवासी मित्र’ म्हणून नियुक्ती केली जाईल. दिवाळीचा हंगाम संपेपर्यंत एसटीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्या कमी करण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, एसटी महामंडळाने दिवाळीत हंगामी भाडेवाढ न केल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.