कंगनाची कोरोना चाचणी निगेटिव्ह, मुंबईच्या दिशेने रवाना!

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत आज (९ सप्टेंबर) मुंबईत दाखल होणार आहे. दरम्यान, कंगनाने मुंबईला येण्यापूर्वी कोरोनाची चाचणी करून घेतली आहे. यात तिचा अहवाल निगेटिव्ह आला असून ती आता मुंबईकडे येण्यासाठी रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सगळ्या घडामोडीत कंगनाने आणखी एक ट्विट करून पुन्हा विरोधकांवर निशाणा साधला आहे. मागील काही दिवसांपासून कंगना राणावत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात ट्विटर वॉर सुरूच आहे.
मुंबईला येण्याआधी तिने एक ट्विट केले आहे. ‘राणी लक्ष्मीबाईंचा पराक्रम, शौर्य आणि बलिदान मी चित्रपटामार्फत जगले आहे. दुःखद गोष्ट म्हणजे, मला माझ्याच महाराष्ट्रात येण्यापासून रोखण्यात येत आहे. मी राणी लक्ष्मीबाईंच्या आदर्शांवर चालणार आहे. नाही घाबरणार, नाही झुकणार. अन्यायाविरोधात आवाज उठवत राहणार. जय महाराष्ट्र, जय शिवाजी’, असे ट्विट कंगनाने केले आहे.





