breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

#MSRTCStrike: एसटी संपाचा ११८ वा दिवस; आज विलीनीकरणासंदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई |

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी म्हणजेच एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर आज उच्च न्यायालयामध्ये महत्वाची सुनावणी होणार आहे. शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल सुरु आहेत. या संपकाळामध्ये एसटीचे १,६०० कोटींचे प्रवासी उत्पन्न बुडाले आहे. संपावर तोडगा काढण्यात एसटी महामंडळाला यश आलेले नसून आज उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. संप सुरु झाल्यानंतर आज ११८ व्या दिवशी या प्रकरणावर न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. विलीनीकरणासंदर्भातील अहवाल आज न्यायालयासमोर सादर केला जाणार आहे.

  • १ हजार ६०० कोटी २५ लाखांपर्यंत नुकसान

विलीनीकरणाच्या मागणीसाठी २८ ऑक्टोबर २०२१ पासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने एसटी सेवा बंद झाली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आगारातून खासगी बसगाड्या, शालेय बस आणि वडाप वाहतुकीला परवानगी देण्यात आली. संप चिघळल्याने प्रवाशांचे हाल सुरूच राहिले आणि एसटीचे नुकसान वाढतच गेल़े नोव्हेंबर २०२१ पर्यंत संपामुळे एसटीचे ४३९ कोटी रुपयांचे प्रवासी उत्पन्न बुडाले होते. त्यात आणखी वाढ झाली असून, ते १ हजार ६०० कोटी २५ लाखांपर्यंत पोहोचल्याची माहिती एसटीतील सूत्रांनी दिली आहे.

  • खासगी वाहतुकीवरच प्रवाशांना अवलंबून

एसटीच्या दररोज १० हजारांहून अधिक फेऱ्या होत असून, रोजची प्रवासी संख्या ७ लाखांहून अधिक आहे. त्यातून ४ कोटी रुपये उत्पन्न मिळत आहे. मोठ्या प्रमाणात चालक, वाहक अद्यापही संपात सहभागी असल्याने एसटीची धाव अपुरीच आहे. ग्रामीण भागात एसटीच नसल्याने रिक्षा किंवा खासगी वाहतुकीवरच प्रवाशांना अवलंबून राहावे लागत आहे. वाहतूक काही प्रमाणात सुरळीत करण्यासाठी महामंडळाने खासगी चालक, वाहकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात १,६०० हून अधिक चालकांची भरती करण्यात आली़ खासगी वाहकांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

  • ५४ हजार कर्मचारी अद्यापही संपात

एसटीचे एकूण ८२ हजार ४८९ कर्मचारी असून, यातील ५४ हजार ३९६ कर्मचारी अद्यापही संपात आहे. २८ हजार ९३ कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहेत. ४ हजार ५८२ चालक आणि ४ हजार ६९८ वाहक कर्तव्यावर असूून प्रशासकीय व कार्यशाळेतील कर्मचारीही कामावर रुजू झाले आहेत. मात्र २५ हजार चालक आणि २० हजार २१२ वाहक संपात असल्याने एसटी पूर्णपणे धावू शकलेल्या नाहीत.

  • बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ९,२५१

एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरूच असून, निलंबित कर्मचारी संख्या ११ हजार २४ आहे. १० हजार ३६२ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, आतापर्यंत ९ हजार २५१ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

  • खासगी संस्थेची मदत घेणार

एसटी महामंडळ व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी खासगी संस्थेची मदत घेणार असल्याची माहिती दिलीय. “प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुन्हा कर्तव्यावर आलेल्या एसटी चालक, वाहकांकडून सेवा दिली जात आहे. त्याचबरोबरच खासगी चालकांकडून एसटी चालवली जात आहे. आता एका खासगी संस्थेकडून वाहकही नियुक्त केले जाणार आहेत. हे वाहक एसटी बसमध्ये सेवा न देता बस आगार, थांबे येथे उभे राहून प्रवाशांना तिकीट देतील. लवकरच त्यांची नियुक्ती केली जाईल,” असं चन्ने म्हणालेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button