नक्षलवादावर आज दिल्लीत बैठक; उध्दव ठाकरेही उपस्थित राहणार
मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवादासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या रविवारी दिल्लीत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या दिल्ली भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वतंत्र भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर आता ते अमित शहा यांना भेटणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
देशातील नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दिल्लीत आयोजित केली आहे. या बैठकीत संबंधित राज्यांच्या नक्षलग्रस्त भागांचा आढावा ते घेणार आहेत. त्यावर केला जाणाऱ्या उपाय योजना, कारवाई आणि इतर बाबींवरही बैठकीत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला अन्य राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत.