आरक्षण होते तर कुणी मराठा समाजाचे वाटोळे केले? मनोज जरांगेंचा सवाल

पुणे : मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांची पुणे येथे सभा झाली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मराठा समाजाने अनेकांना मोठे केले. मराठा समाजाची वारंवार फसवणूक होत आहे. मराठा समाजाचे वाटोळे कुणी केले? असा सवाल जरांगेनी यावेळी उपस्थित केला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाने नेहमी सर्वांना मदत केली. कधी जातीवाद केला नाही. अडचणीच्या काळात मराठा समाजाने सर्वांना मदत केली. गेल्या ७५ वर्षांत जे जे पक्ष झाले, त्या पक्षातील सर्व नेत्यांना मोठे करण्याचे काम मराठा समाजाने केले. ज्या नेत्यांना मराठ्यांनी मोठे केले, कारण त्यांना हे नेते आपले वाटले. मराठा समाजास विश्वास होता की, कधी अडचण आली तर हे लोक मराठा समाजासाठी मदत करतील. आज आरक्षणासाठी मराठा समाजातील मुलांना आरक्षणांची गरज आहे. परंतु त्यांना कोणी मदत करत नाही. नेते मराठा समाजातील मुलांकडे बघण्यास तयार नाही.
हेही वाचा – विश्वचषकात ICC तर्फे प्रत्येक संघाला मिळाले इतक्या कोटीचे बक्षिसे; कमाई वाचून तुम्हीही व्हाल चकित
आपण ज्यांना मोठे केले ते आता आरक्षण मिळू देणार नाही, असे म्हणत आहे. यामुळे मराठ्यांना आता तरी सावध व्हा. मराठा समाज मागास आहे, याचे पुरावे मिळत आहेत. राज्यात आतापर्यंत २९ लाख नोंदी सापडले आहेत. मग जर मराठा आरक्षणात होते तर ७० वर्षांपासून कुणी मराठा समाजाचे वाटोळे केले? त्याचे उत्तर आम्हाला द्या. मराठा समाजास आरक्षण कुणी मिळू दिले नाही त्याचे नाव आम्हाला द्या? मराठा समाजास आरक्षण असताना देखील कुणी लपवून ठेवले? आमचे मुडदे कोणी पाडले त्याचे उत्तर द्या, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.