राज्याच्या अर्थसंकल्पातही मोठ्या घोषणा होणार? बारामतीतील कार्यक्रमातून अजित पवारांनी दिले संकेत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/pune-23-780x470.jpg)
पुणेः नुकताच देशाचा २०२५-२६ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेक मोठे निर्णय घेण्यात आल्याचे दिसून आले आहे. देशातील शेतकरी मध्यमर्गीय यांना डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्पात विविध तरतूदी करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पातील १२ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नसल्याचा सर्वात मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशातच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मी देखील राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार, लाडक्या बहिणींना आणि सर्वसामान्य जनतेला केंद्र बिंदू म्हणून ठेवणार असल्याचे प्रतिपादन केले आहे. ते बारामती तालुक्यातील शिरसणे येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
अजित पवारांच्या या विधानाने यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात देखील मोठ्या घोषणा आणि निर्णय केंद्रातील अर्थसंकल्पानुसार घेतल्या जाऊ शकतात, असे संकेत स्वतः अजित पवार यांनी दिले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष आता राज्यातील अर्थसंकल्पाकडे लागले आहे. मी देखील अर्थसंकल्प सादर करणार आहे. लाडक्या बहिणी आणि सर्वसामान्य जनता यांना केंद्र बिंदू मानून अर्थसंकल्प सादर करणार आहे. सहकारी संस्था टिकल्या पाहिजेत, सहकार चळवळ संपुष्टात आली, तर खाजगीवाले कशीही पिळवणूक करतील. सहकारी संस्था टिकवण्यासाठी डोळ्यात तेल घालून काम करावे लागेल, असे अजित पवार यावेळी बोलताना सांगितले.
हेही वाचा : Union Budget 2025 | मध्यमवर्गाला दिलासा! १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त; नवी कररचना कशी?
महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्र्यांकडे अनेक महत्वाची खाते आहेत. यामध्ये सहकार आणि कृषी, वैद्यकीय शिक्षण, अन्न नागरी पुरवठा, क्रीडा, अल्पसंख्यांक विभाग, महिला बालविकास अशी खाती जाणीवपूर्णक आपण घेतली असल्याचे अजित पवार म्हणाले. जिल्हा परिषद आणि प्राथमिक आरोग्यचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषदेचे शिक्षण सुधारले पाहिजे, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.