मोसमी पावसाच्या हंगामावरील ‘एल निनो’ चा प्रभाव वाढणार ? निम्मा महाराष्ट्र दुष्काळाच्या सावटाखाली

मुंबई : राज्यच्या काही भागात मागील आठवड्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस होऊन काही भागात जुलैच्या सरासरी पावसाहून अधिक पाऊस नोंदला गेला. मात्र, राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीहून कमी पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिना हा शेतीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. मात्र, सध्या पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र असून पुढील आठवडाभर तरी राज्यात काही भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वगळता सर्वदूर पावसाची शक्यता कमीच आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, मोसमी पावसाच्या हंगामावरील प्रशांत महासागरतील ‘एल निनो’ स्थितीचा प्रभाव वाढताना दिसत असून पावसाचे प्रमाण असमान होत आहे.
यंदा राज्यात मोसमी पावसाच्या आगमनापासून त्याचे अनेक भागात होणारे असमान प्रमाण दिसून येत आहे. जून महिन्यात दीर्घ काळ पावसाने ओढ दिल्यानंतर जुलैच्या सुरुवातील मोमसी पाऊस सक्रिय होऊन कोकण प्रदेशासह मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला. मात्र, राज्यातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे आणि विदर्भातील काही भागात आतापर्यत सरासरीहून कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यातील निम्मा भाग सध्या दुष्काळाच्या सावटाखाली आहे. आतापर्यतच्या हंगामात १ जून पाऊस संपूर्ण राज्यात जरी सरासरीच्या आसपास पावसाची नोंद झाली असली तरीही बहुतांश जिल्ह्यात शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या पावसाचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. दरम्यान. तमिळनाडू वगळता दक्षिणेकडील अनेक राज्यात सरासरी पावसाचे प्रणाम कमी असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा – ‘लाड-पागे समितीच्या शिफारसींनुसार सुमारे ५०० लोकांना लवकरच नियुक्तीचे आदेश’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील कोकण प्रदेशासह मध्य महाराष्ट्रातील काही प्रदेशात सरासरीहून अधिक पावसाची नोंद झाली असून काही भागात सरासरीच्या आसपास पाऊस पडला आहे. मात्र, १ जून पाऊस आतापर्यंत राज्यातील बहुतांश भागात सरासरी पावसाहून ३० ते ४० टक्के काही भागात ५० ते ७० टक्के कमी पाऊस नोंदला गेला असल्याने आता चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच संपूर्ण मोसमी पावसाच्या हंगामांवर ‘एल निनो’ स्थितीचा परिणाम राहील, अशी शक्यता याआधीच हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, मोसमी पावसाच्या उर्वरित हंगामात ‘एल निनो’ स्थितीची तीव्रता वाढण्याचा अंदाज हवामान असून या स्थितीचा प्रभाव २०२७ च्या सुरुवातीपर्यंत राहील, असा अंदाज हवामान अभ्यासक व्यक्त करत आहेत. दरम्यान, काही अभ्यासकांच्या मते, १९५० पासूनच्या हवामान नोंदी पाहिल्यास यावर्षी ही स्थिती अधिक तीव्र असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच दशकभरापूर्वी २०१५-१६ या वर्षी भारतातील मोसमी पावसाच्या हंगामावर ‘एल निनो’ चा मोठा प्रभाव दिसून आला होता.
दरम्यान, पावसाने विश्रांती घेतल्याने मागील काही दिवसांच्या तुलनेत राज्यातील बहुतांश भागातील उकडयात काहीशी वाढ होताना दिसत आहे. तसेच मुंबईसह कोकण प्रदेशातील काही भागात रात्रीच्या उकाड्यातही वाढ होत आहे. पावसाळी हवामान नसल्याने काही भागात उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या हवेचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसात राज्यातील कमाल तापमानात १ ते २ अंशांनी हळूहळू वाढ होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, राज्यात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असून मोसमी पावसाला बळ देणाऱ्या हवामान प्रणाली सक्रिय झाल्यास पावसाची शक्यात व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सोमवारी आणि मंगळवारी संपूर्ण राज्यात पावसासाठी कोणतेही इशारे हवामान विभागाकडून देण्यात आले नाहीत. त्यामुळे संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
प्रशांत महासागरात ‘एल निनो’ स्थिती सक्रिय आहेच. ‘एल निनो’ वर्षात अनेकदा अतिवृष्टी सदृश्य पावसाची नोंद होते तर अनेकदा मोसमी पावसाच्या हंगामाच्या दरम्यान पावसाचा खंड पडतो. तसेच त्यामुळे पावसाचे वाटप सम प्रमाणात होत नाही. मात्र, ‘एल निनो’ स्थितीच्या प्रभावाची तीव्रता ही आठवड्याभराच्या हवामानावरून मोजली जात नाही तर व्यापक कालावधीत त्याचे हवामानावर काय परिणाम होतात, यावरून मोजली जाते.
– एस. डी. सानप, शास्त्रज्ञ, हवामान विभाग, पुणे





