काय होईल ते होईल, मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, संभाजीराजे रायगडावरून कडाडले
![Whatever happens, the Maratha community will not remain silent without giving justice, Sambhaji Raje left Raigad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/Chhatrapati-Sambhajiraje16-1.jpg)
रायगड – “आत्तापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला. हो आहे मी संयमी. पण इथून पुढे तुम्ही माझा संयम पाहणार नाहीत. मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल. म्हणून आम्ही ठरवलंय की आंदोलन हे निश्चित आहे”, अशा कडक शब्दांत खासदार संभाजी राजे भोसले रायगडावरून कडाडले आहेत. आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने त्यांनी रायगडावरून आपली भूमिका मांडली.
सर्वोच्च न्यायालायने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला. त्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. मात्र, या रागावर भाजपचे खासदार संभाजीराजे भोसले यांच्यामुळे नियंत्रण मिळाले. अनेक मराठा मोर्चा संघटनांनी संभाजीराजे यांच्या संयमी भूमिकेमुळे संयम दाखवला. मात्र, ६ जूनपर्यंत सरकारने भूमिका जाहीर केली नाहीतर ७ जूनपासून रायगडावरून मोर्चा काढू असा इशारा संभाजीराजेंनी दिला होता. त्यानुसार रायगडावर झालेल्या शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमानंतर संभाजीराजे भोसले यांनी आपली भूमिका मांडली आहे
“तुम्ही आजपर्यंत संभाजी छत्रपतींना संयमी बघितलं आहे. हो आहे मी संयमी. पण आजपासून तो संयम मी बाजूला ठेवला आहे. खासदार लोकसभेचा पगार घेतात, आमदार विधानसभेचा पगार घेतात. तुमची जबाबदारी आहे ती. पण कुठलाही आमदार पुढे आलेला नाही. तुमची काय जबाबदारी आहे यावर बोला. आत्ताच्या सरकारला हात जोडून विनंती केली. पण तरी काही फरक पडत नाही. पण यापुढे तुम्ही माझा संयम बघूच शकणार नाही. मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल. म्हणून आम्ही ठरवलंय की आंदोलन हे निश्चित आहे”, अशा शब्दांत संभाजीराजेंनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
“आम्हाला गृहीत धरू नका, एवढंच सांगतो”
“मला सांगायचंय की सध्या तुम्ही रस्त्यावर येऊ नका. पहिली जबाबदारी आमच्या लोकप्रतिनिधींची आहे. पहिला मोर्चा शाहू महाराजांच्या समाधीच्या ठिकाणाहून होणार आहे. लोकप्रतिनिधींनी सांगायला हवं की सकल मराठा समाजाला तुम्ही कसा न्याय देणार आहात. तेव्हाच बोलायचं. कोविड संपल्यानंतर देखील तु्म्ही ठोस पावलं उचलली नाहीत, तर संभाजीराजांसह संपूर्ण मराठा समाज मुंबईपर्यंत लाँग मार्च करणार. तिथे तुम्हाला लाठी मारायची असेल, तर पहिली लाठी संभाजी राजेला मारावी लागेल. छत्रपतींच्या वंशजावर पहिली लाठी मारावी लागेल. आम्हाला गृहीत धरू नका, एवढंच सांगतो”, असं देखील संभाजीराजे भोसले यावेळी म्हणले.
“कोण चुकलं कोण बरोबर, आम्हाला घेणं-देणं नाही”
“२००७ पासून मी महाराष्ट्र पिंजून काढला. ज्या सुखाने बहुजन समाज नांदत होता, मराठा समाज नांदत होता, तो आज का नाही. म्हणून मी मराठा समाजासाठी बाहेर पडलो. किती आंदोलनं केले. पण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही. तो SEBC मध्ये येऊ शकत नाही. म्हणून समाजाला मिळालेलं आरक्षण काढून घेण्यात आलं. त्यामुळे सगळे समाजाचे लोक दु:खी झाले. पण माझा लढा ७० टक्के गरीब मराठ्यांसाठी आहे. आपलेच पुढारी कोण चुकलं-कोण बरोबर या स्पर्धेत लागले. मागच्या सरकारचे लोकं म्हणाले आत्ताच्या सरकराने मांडणी बरोबर केली नाही. आत्ताचं सरकार म्हणतंय तुम्ही कायदा बरोबर केला नाही. मी मोठा की तू मोठा, हेच चाललं आहे. आमची मागणी एकच आहे, आम्हाला न्याय द्या. कोण चुकलं त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही”, अशा शब्दांत संभाजीराजे भोसले यांनी आपला संताप व्यक्त केला.