#Waragainstcorona: अंगणवाडीतील बालकांना घरपोच शिधा: महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/10-9.jpg)
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
करोनाच्या संसर्गाचा धोका निर्माण होऊ नये म्हणून ताळेबंदीमुळे राज्यातील बहुतांश व्यवहार ठप्प आहेत. महिला व बालकल्याण मंत्रालयांतर्गत येणा-या अंगणवाड्यांमध्ये दिले जाणारा शालेयपूर्व शिक्षण व पोषण आहारही स्थगित करण्यात आला आहे. मात्र, असे असले तरी तीन ते सहा वर्षे वयोगटांतील बालकांना घरपोच शिधा देण्यात येणार आहे. येत्या १५ दिवसांत संपूर्ण राज्यात १०० टक्के गरम ताज्या आहाराऐवजी कोरडा शिधा वाटपाचे उद्दिष्ट महिला व बालकल्याण मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आखले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीतही राज्याचा कारभार प्रभावीपणे हाकण्याचा प्रयत्न शासनातर्फे होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी, १७ एप्रिल रोजी महिला व बालकल्याण मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह अमरावती येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील सर्व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) यांच्याशी संपर्क साधून आढावा घेतला. या कॉन्फरन्समध्ये महिला व बालविकास सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास योजना श्रीमती इंद्रा मालो, महिला व बालविकास आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती श्रद्धा जोशी, बाल हक्क आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती सीमा व्यास, राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती आस्था लुथरा आदी सहभागी झाले.