महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी आज मतदान; जनता कोणाला देणार कौल?

मुंबई : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी गुरुवारी, १५ जानेवारी रोजी मतदान होत असून राज्यातील सर्व पक्षांनी प्रचारच्या शेवटच्या टप्प्यात आपापले रणांगण सज्ज केले आहे. विशेषतः बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) हे सर्वात महत्त्वाचे रणांगण असून भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आणि ठाकरे बंधूंनी उभी केलेली संयुक्त आघाडी यांच्यात जोरदार स्पर्धा सुरु आहे.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या ८९३ प्रभागांतील २,८६९ जागांसाठी मतदान सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत होणार आहे. मतमोजणी १६ जानेवारी रोजी होणार आहे. मुंबईतील १,७०० आणि पुण्यातील १,१५३ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. बीएमसीमध्ये एकूण २२७ जागा असून भाजप १३७, शिवसेना ९० आणि राष्ट्रवादी काँग्रेस ९४ जागांसाठी स्वतंत्रपणे लढत आहेत.
बीएमसीच्या निवडणूकीमध्ये विरोधकांनी मराठी महापौर हा मुद्दा केंद्रस्थानी घेतला होता. यावर महायुतीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उद्धवसेना व मनसे यांनी मुंबईत सर्वाधिक उमेदवार निवडून आणले तर मुस्लीम महापौर देखील नियुक्त होवू शकतो, असा दावा देखील फडणवीसांकडून करण्यात आला आहे. यावर उत्तर देताना उद्धवसेना व मनसे यांनी मराठी अस्मिता टिकून रहावी, यासाठी हा मुद्दा उपस्थित केल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा – भारतीयांना आता ‘या’ 55 देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, पाहा संपूर्ण यादी
फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांचे राज्यव्यापी प्रचार जोरदार झाले. तसेच उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षांच्या नेत्यांनी मुंबई, ठाणे व नाशिकमध्ये महत्त्वाच्या सभांना संबोधित केले. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही स्थानिक आघाड्या तयार करून महाराष्ट्रात आपले अस्तित्व प्रस्थापित केले आहे. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्यासह महापालिका निवडणुकांमध्ये युती केली आहे.
निवडणुकीमध्ये महिला मतदारांना केंद्रस्थानी धरून पक्षांनी विशेष आश्वासने दिली आहेत. महायुतीने बेस्ट बस प्रवासात महिलांना ५०% सवलत, आणि ठाकरे आघाडीने महिला घरकामगारांना दरमहा 1,500 भत्ता तसेच ७०० चौ.फुटांपर्यंत मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेसने मुंबईतील प्रदूषण नियंत्रण, बेस्टचा आधुनिकीकरण आणि आर्थिक स्थिरता यावर भर दिला आहे.




