क्रीडा विश्व : माजी क्रिकेटर विनोद कांबळी आज 53 वर्षांचा झाला!
18 जानेवारी 1993 रोजी विनोद कांबळी ही धमाकेदार इनिंग खेळला होता.
![Vinod Kambli, today, year, explosive, innings, game,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/kambli-780x470.jpg)
मुंबई : विनोद कांबळीसाठी आजचा दिवस खूप खास आहे. कारण आजच्याच दिवशी त्याचा जन्म झाला होता. 1972 चा जन्म असलेला विनोद कांबळी आज 53 वर्षांचा झाला आहे. विनोद कांबळीसाठी ही तारीख काही दुसऱ्या कारणांमुळे सुद्धा खास आहे. 18 जानेवारीलाच विनोद कांबळीने अशी काही कमाल केली होती की, तो कधी विसरणार नाही. विनोद कांबळीने 18 जानेवारीलाच वाढदिवशी करिअरमधील पहिलं शतक झळकावलं होतं. त्यावर्षी कांबळीचा 21 वा वाढदिवस होता. जयपूरमध्ये इंग्लंड विरुद्ध तो शतकीय इनिंग खेळला होता.
18 जानेवारी 1993 रोजी विनोद कांबळी ही धमाकेदार इनिंग खेळला होता. आपल्या वाढदिवशी विनोद कांबळी तिसऱ्या नंबरवर फलंदाजीसाठी उतरला होता. टीम इंडियाची खराब सुरुवात झाली. नवज्योतसिंह सिद्धू दुसऱ्याच चेंडूवर आऊट झाला. त्यानंतर कांबळीने विकेटवर येऊन टीम इंडियाचा डाव सावरला. जयपूरची विकेट फलंदाजीसाठी कठीण होती. म्हणून कांबळीने क्रीजवर पाय रोवून फलंदाजी केली.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा :
सचिनने त्या मॅचमध्ये किती धावा केलेल्या?
त्याने बालमित्र सचिन तेंडुलकरसोबत मिळून टीम इंडियाची धावसंख्या 223 पर्यंत पोहोचवली. कांबळीने 202 मिनिट फलंदाजी केली. त्याने 149 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. त्याने 9 चौकार आणि एक षटकार लगावला. सचिनने 81 चेंडूत 82 धावा केल्या. त्याने सहा फोर आणि एक सिक्स मारला. भारताचा या सामन्यात पराभव झाला होता. इंग्लंडने चार विकेट राखून 223 धावांच लक्ष्य पार केलं होतं.
शेवट तितकाच वाईट
विनोद कांबळीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटची धमाकेदार सुरुवात केली होती. सचिनने कांबळीच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पण सचिनच्या दीड वर्ष आधी कांबळीने आपलं पहिलं वनडे शतक झळकावलं होतं. कांबळीने आपल्या पहिल्या चार कसोटी सामन्यातच दोन द्विशतकं झळकावली होती. त्याने पुढच्या दोन टेस्ट मॅचमध्ये सुद्धा आणखी दोन शतकं झळकावली. कांबळीने जितकी दमदार त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात केली होती, शेवट तितकाच वाईट झाला. कांबळीने टीम इंडियाकडून खेळताना 17 टेस्ट मॅचमध्ये 54.20 च्या सरासरीने 1084 धावा केल्या. कांबळी 104 वनडे सामने खेळला. त्यात त्याने 32.59 च्या सरासरीने 2477 धावा केल्या.