ऊसतोड मजुरांना 10 लाखांचा व बैलांना 1 लाखाचा विमा द्यावा, विनायक मेटेंची मागणी
![Vinayak Mete demands Rs 10 lakh insurance for sugarcane workers and Rs 1 lakh for oxen](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/vinayak-mete.png)
मुंबई – ऊसतोड मजुरांना 10 लाखांचा व बैलांना 1 लाखाचा विमा द्यावा, अशी मागणी राज्य सरकारकडे आमदार विनायक मेटेंनी विधानपरिषदेत केली. राज्यात साडे आठ लाख ऊसतोड कामगार आहेत, मात्र त्यांना कोणत्या कायद्याचे संरक्षण नाही. त्यामुळे माथाडी कामगारांसाठी जसा कायदा आहे, तसाच ऊसतोड मजुरांसाठी करावा, अशी मागणी मेटेंनी केली.
रात्रंदिवस काम करणाऱ्या ऊसतोड कामगारांना कोणताही लाभ मिळत नाही, उलट यंत्रावर काम करणाऱ्यांना जास्त पगार आणि अंगमेहनत करणाऱ्या कामगारांना कमी पगार हा उसतोड कामगारांवर अन्याय आहे. त्यांना पगाराचे भाव वाढून द्यावे अशी मागणी देखील त्यांनी केली.
वाचा :-‘मुंबई पोलिसांचे ‘थोबाड काळे झाले’ अशी भाषा फडणवीस कशी करू शकतात ?’
ऊसतोड लवादाला कोणतेही कायदेशीर अधिकार नाहीत, यासाठी शासनाने मंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली ऊसतोड कामगारांचे प्रतिनिधी, वाहतूकदार आणि शासन प्रतिनिधी यांची समिती आखावी. तसेच, ऊसतोड मजुरांना 10 लाखांचा विमा आणि बैलांना 1 लाखाचा विमा देण्याची घोषणा राज्य सरकारने करावी, असे मेटे म्हणाले.
मेटेंच्या मागणीनंतर सामाजिक न्याय मंत्री यांनी पुढच्या तीन महिन्यात महामंडळातर्फे या मजुरांसाठी शिक्षण, आरोग्य आणि इतर सुविधांसाठीच्या योजना जाहीर करणार असून मजुरांच्या हक्कासाठी कायदा तयार करण्याचे काम प्रस्तावित असल्याचे सांगितले. तसेच, ऊसतोड कामगारांची संख्या जास्त असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात संत भगवानबाबा यांच्या नावाने निवासी शाळा उभारण्यात येणार असल्याचीही घोषणा त्यांनी यावेळी केली.