‘मी ५५ हजारांच्या मताधिक्याने निवडून येणार’; वसंत मोरेंना विश्वास
![Vasant More said that I will be elected with a majority of 55 thousand votes](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Vasant-More-780x470.jpg)
पुणे | प्रकाश आंबेडकर यांनी वसंत मोरे यांना पुणे लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता पुणे लोकसभेच्या निवडणुकीत तिरंगी लढत पाहण्यास मिळणार आहे. वंचितकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वसंत मोरेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मी ५५ हजारांच्या मताधिक्याने निवडून येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वसंत मोरे म्हणाले की, मला उमेदवारी मिळावी याकरिता महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटलो. पण मला काही कारणास्तव उमेदवारी मिळाली नाही. मात्र आज वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी देऊन मला काम करण्याची संधी दिली. याबद्दल मी त्यांचा आभारी असून प्रकाश आंबेडकर यांना समाजातील प्रत्येक घटक मानणारा आहे. त्यामुळे या निवडणुकीत मला अधिकाधिक फायदा होईल आणि मी किमान ५५ हजारांच्या मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुरलीधर मोहोळ आणि रविंद्र धंगेकर या दोघांसोबत मी पुणे महापालिकेमध्ये एकत्रित काम केले आहे. ते दोघे पण माझे चांगले मित्र आहेत. तसेच मी या निवडणुकीत वैयक्तिक टीका करणार नाही. तर त्यांच्या पक्षाच्या ध्येयधोरण आणि चुकीच्या कारभाराविरोधात सातत्याने भूमिका मांडत राहणार, त्याचबरोबर आजवरचं माझं काम पाहून पुणेकर नागरिक माझ्या पाठीशी उभे राहून मला विजयी करतील, असं वसंत मोरे म्हणाले.
हेही वाचा – राज्यातील ‘या’ विभागात ‘या’ दिवशी अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार
मागील २५ वर्षापासुन राज ठाकरे यांच्यासोबत काम करत राहिलो. त्या कालावधीत पुणे महापालिकेमध्ये तीन वेळा नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळावी आणि त्या संधीचे सोने केले. या १५ वर्षाच्या नगरसेवक पदाच्या काळात सत्तेमध्ये नसताना देखील कात्रज प्रभागाचा सर्वांगीण विकास केला आहे. कात्रज प्रभाग हा शहरासमोर रोल मॉडेल ठरल आहे. माझ्याकडून प्रभागात सर्व विकास काम सुरू होती.
त्याच दरम्यान राज ठाकरे यांनी पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. ती जबाबदारी देखील चोखपणे बजावत, शहरात पक्ष वाढविण्याचे काम केले.त्या माध्यमातुन लोकसभेची तयारी सुरू केली. पण पक्षातील काहींनी राज ठाकरे यांना माझ्याबद्दल निगेटिव्ह रिपोर्ट पाठवले. त्यानंतर अनेक घडामोडी घडत गेल्या आणि त्यानंतर मी अखेर पक्षामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मी राज मार्गावर होतो आणि आता राजमार्ग सोडून राजगृहच्या मार्गावर गेलो आहे. पण राज ठाकरे यांच्यापासून दूर गेल्यानंतर मागील १५ दिवस माझ्यासाठी हा कठीण काळ होता, असंही वसंत मोरे म्हणाले.