अज्ञात मृतदेह ना मोबाईल ना ओळखपत्र, दोन टोप्यांवरुन १२ तासांत आरोपीला ठोकल्या बेड्या
![अज्ञात मृतदेह ना मोबाईल ना ओळखपत्र, दोन टोप्यांवरुन १२ तासांत आरोपीला पकडलं](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/अज्ञात-मृतदेह-ना-मोबाईल-ना-ओळखपत्र-दोन-टोप्यांवरुन-१२-तासांत.jpg)
डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे मैदानात एका व्यक्तिची निर्घृण हत्या करून त्याला आडोशाला फेकून देण्यात आले होते. ही हत्या रविवारी (१२ जून) रात्री झाली असून सोमवारी (१३ जून) दुपारी या भागात दुर्गंधी येऊ लागल्यानंतर हा खुनाचा प्रकार उघड झाला. यानंतर विष्णूनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. मृत व्यक्ती हा बिगारी असल्याने त्याच्याकडे मोबाईल नव्हता, ना कोणते ओळखपत्र होते. त्यामुळे आरोपी शोधण्यासाठी पोलिसांकडे कोणताही पुरावा नव्हता. मात्र, पोलिसांनी विविध पथकं तयार करून तांत्रिक पध्द्तीने आणि सीसीटीव्हीच्या आधारे १२ तासाच्या आत आरोपीचा शोध लावत त्याला अटक केली आहे. आरोपीचे नाव अर्जुन मोरे (वय ३९) असून दारूच्या नशेत त्याने हत्या केल्याचं आरोपीने मान्य केले आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे ग्राउंडवर एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने शहरात काल एकच खळबळ उडाली होती. दुपारच्या सुमारास काही नागरिकांचं या मृतदेहाकडे लक्ष गेलं त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि नंतर तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दरम्यान मृत व्यक्तीच्या डोक्यावर जबर मारहाण केल्याने त्याची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. सदर घटनास्थळी काल डोंबिवली विष्णूनगर पोलीस पाहणी करत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, मृत व्यक्ती हा बिगारी असल्याने त्याच्याकडे मोबाईल नव्हता, ना कोणते ओळखपत्र होते. त्यामुळे आरोपी शोधण्यासाठी पोलिसांकडे कोणताही पुरावा नव्हता.
पोलिसांनी विविध पथक तयार करून तपास सुरू केला. याच तपासादरम्यान घटनास्थळी त्यांना दोन टोप्या सापडल्या. या टोप्या कोणाच्या आहेत, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावरील सीसीटीव्ही चेक केले आणि काही तांत्रिक पध्दतीने एका व्यक्तीला शोधले. त्या व्यक्तीने साक्षीदार बनत पोलिसांना घडलेली माहिती सांगितली. पोलिसांनी लगेच इतर सीसीटीव्हीचा आधार घेत अखेर आरोपीला भागशाळा मैदान येथून पकडले. सदर आरोपीचे नाव अर्जुन मोरे (वय ३९) असून तो बिगारी म्हणून काम करतो. दरम्यान, दारुच्या नशेत वादावादी झाल्याने हत्या केल्याचं आरोपीने मान्य केले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून आता कोर्टात हजर केले जाईल. तर मृत व्यक्तीचे नाव अद्याप समजले नसून आम्ही त्याचा शोध घेत आहोत असे डोंबिवली एसीपी सुनील कुराडे यांनी सांगितले.
नक्की काय घडलं?
मृत व्यक्ती, आरोपी अर्जुन मोरे आणि साक्षीदार हे रेल्वेच्या मैदानात दारू प्यायला बसायचे. त्यातून त्यांची एकमेकांशी ओळख झाली. रविवारी रात्री सुद्धा हे मैदानात दारू प्यायला बसले होते. फुकटचे जेवण मिळाल्याने यांनी अजून दारू प्यायली आणि मृत व्यक्ती, आरोपी अर्जुन यांच्यात दारूच्या नशेत बाचाबाची झाली. याच वेळी अर्जुनने त्या व्यक्तीला लाकडी फळी डोक्यात मारली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.