‘तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावान मुसलमान परवडला’; संजय राऊत यांची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका

मुंबई | परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेना (ठाकरे गट)चे सय्यद इकबाल सय्यद खाजा यांची निवड झाल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. उपमहापौरपदी काँग्रेसचे नगरसेवक गणेश देशमुख यांची निवड झाली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०१९ ला त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले होते. आता परभणीत त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आला, अशी टीका केली होती. यावर आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत म्हणाले, परभणीत भाजपाचे १२ नगरसेवक मुस्लीम आहेत. हे एकनाथ शिंदेंना माहीत आहे का? इतर ठिकाणीही असंख्य मुस्लीम नगरसेवक आहेत. या राज्यात मराठी भाषिक मुस्लीम आहेत. ते काही घुसखोर नाहीत. आमचे अनेक पदाधिकारी मुस्लीम असून ते वर्षानुवर्ष काम करत आहेत. ते मुस्लीम आहेत, म्हणून त्यांना पदापासून दूर ठेवणार का? तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावान मुसलमान परवडला.
हेही वाचा : मंत्री नरहरी झिरवळ यांच्या लिपिकास मंत्रालयात लाच घेताना अटक
महापौर सय्यद इकबाल खाजा हे अनेक वर्षांपासून आमचे निष्ठावान कार्यकर्ते आणि तालुका प्रमुख आहेत. त्यांना जर परभणीत महापौर केले तर गद्दारांच्या पोटात दुखणारच. तुम्ही मुस्लीम समाजाला कधी तिकीट दिले नाही का? भाजपानेही मुस्लीम उमेदवारांना तिकीटे दिलेली आहेत. या देशात सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात मुस्लीम व्यक्ती न्यायाधीश होतात. राज्यपाल मुस्लीम होतात, भाजपाने अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती पद दिले होते. हे एकनाथ शिंदे आम्हाला काय सांगणार?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
भाजपाला जर महापौर बनविण्याची संधी मिळाली असती तर त्यांच्या १२ मुस्लीम नगरसेवकांपैकीच एक महापौर झाला असता, हे लक्षात ठेवा. या देशामध्ये हिंदू-मुस्लीम करण्यापलीकडे यांच्याकडे कोणताही कार्यक्रम नाही, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.




