महाराष्ट्राला दोन नव्या बुलेट ट्रेन मार्गांची घोषणा; पुणे-मुंबईकरांना मोठा फायदा

मुंबई | देशातील वेगवान रेल्वे प्रकल्पांना गती देताना केंद्र सरकारने सात नव्या बुलेट ट्रेन मार्गांचे नियोजन सुरू केले असून त्यात महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या मार्गांचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई–पुणे आणि पुणे–हैदराबाद या मार्गांना प्राधान्य देण्यात आले असून या घोषणेने पुणेकर आणि मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पानंतर आता देशातील इतर प्रमुख शहरांनाही हाय-स्पीड रेल्वेने जोडण्याचा केंद्राचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई–पुणे बुलेट ट्रेन प्रकल्प विशेष चर्चेत असून, या मार्गावरील प्रवास केवळ ४८ मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या तासन्तास लागणारा प्रवास यामुळे मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
हेही वाचा : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अवकाळी पावसाचे संकट; राज्यात येलो-ऑरेंज अलर्ट
तसेच पुणे–हैदराबाद या महत्त्वाच्या आयटी आणि औद्योगिक मार्गावरही बुलेट ट्रेन प्रस्तावित करण्यात आली आहे. या मार्गावरील प्रवासाचा कालावधी सुमारे दोन तासांपर्यंत मर्यादित राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे दोन्ही शहरांतील आर्थिक, व्यावसायिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संबंध अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत ही माहिती दिली. या दोन्ही प्रकल्पांमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळण्याबरोबरच प्रवाशांसाठी जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, मुंबई–नागपूर बुलेट ट्रेनची मागणीही याआधीपासून होत असताना सध्याच्या घोषणेत या मार्गाचा उल्लेख नसल्याने काही स्तरांतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तरीही सध्या जाहीर करण्यात आलेल्या दोन प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडण्याची शक्यता आहे.





