गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अवकाळी पावसाचे संकट; राज्यात येलो-ऑरेंज अलर्ट

पुणे | मराठी नववर्षाची सुरुवात मानला जाणारा गुढीपाडवा यंदा अवकाळी पावसाच्या सरींसह साजरा होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिला असून अनेक ठिकाणी येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. फेब्रुवारीच्या मध्यापासूनच तापमानात झपाट्याने वाढ होऊन काही भागांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले होते. मार्चच्या सुरुवातीलाच उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. मात्र आता अचानक वातावरणात बदल होऊन अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार गुरुवारी (२० मार्च) राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यातील २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून ७ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा : मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा आता सातही दिवस !
उत्तर कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. दक्षिण कोकण व गोवा परिसरात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, नागपूर, अमरावतीसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार वाऱ्याचीही शक्यता आहे.
दरम्यान, मुंबई शहर व उपनगरांमध्ये आकाश प्रामुख्याने निरभ्र राहण्याची शक्यता असून कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.





