महाविकास आघाडीत कितीही भांडणे लावण्याचा प्रयत्न करा; मंत्री यांनी भाजपवर हल्लाबोल
![Try to stir up any controversy in the Mahavikas front; Minister attacks BJP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Try-to-stir-up-any-controversy-in-the-Mahavikas-front-Minister-attacks-BJP.jpg)
प्रतिनिधी, कोल्हापूर
महाविकास आघाडीतील तीन पक्षात कितीही भांडण लावण्याचा प्रयत्न करा, हे सरकार पडणार नाही, अडीच वर्षे आम्ही टिकलोय, पुढील अडीच वर्षेही आम्ही राहणारच असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोल्हापुरात व्यक्त केला. दरम्यान, तुम्ही जेवढं सरकार पाडण्याचा प्रयत्न कराल तेवढं आम्ही भक्कम होवू असा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या नेत्यांना मारला.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत थोरात, पाटील यांच्यासह ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil), राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह अनेकानी भाजपवर जोरदार हल्ला चढविला.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्ह्णाले, महागाईवर चर्चा न करता सध्या भावनांना हेलकावे देण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. धर्माधर्मात तेढ वाढवलं नाही तर आपला सुपडासाप होईल याची त्यांना भीती आहे, त्यामुळेच सात वर्षे सत्तेत असूनही विकास न केल्याने मतासाठी एका चित्रपटाचे मार्केटिेंग केले जात आहे. ते म्हणाले, कायदा हातात घेऊन विरोधकांना धडा शिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऐकत नसतील तर त्यांना अडचणीत आणले जात आहे. दहशतवाद्यांना लावणारे कायदे राजकीय नेत्यांना लावले जात आहेत.
ते म्हणाले, महाराष्ट्रातील सरकार पडल्याचे स्वप्न भाजपचे नेते रोज पाहतात. सकाळी उठल्यानंतर सरकार भक्कम असल्याचे कळते. मग ते रोज एक नवीन तारीख देतात. आता तर विरोधी पक्षनेते २०२४ ला स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत, त्यामुळे अडीच वर्षे काहींही होणार नाही हे स्पष्ट आहे. कारण महाविकास आघाडीचा एकही आमदार फुटत नाही हे त्यांच्या लक्षात आले आहे
तुम्ही त्रास दिला म्ह्णून ते पुण्याला पळून गेले असा टोला चंद्रकांत पाटील यांना मारताना ते म्हणाले, ते म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्यासारखे अध्यक्ष भाजपला असणे हे आपल्या सोयीचे असल्याचा टोला मारताना ते म्हणाले, असा भला माणूस त्या पक्षाचा अध्यक्ष असणे हे आपल्याला चांगले आहे.
महसूल मंत्री थोरात म्हणाले, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून महाविकास आघाडी राज्यात काम करत आहे. प्रत्येक संकटावेळी हे सरकार अधिक भक्कम झाले आहे. त्यामुळे सरकार पाडण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा जेवढा वापर कराल तेवढा आम्ही भक्कम होणार आहे. काँग्रेसच्या काळात थोडी महागाई वाढली तर आंदोलन करणारे भाजपचे कार्यकर्ते आता कुठे लपून बसलेत असा सवालही त्यांनी केला.
पालकमंत्री सतेज पाटील म्ह्णाले, पाच वर्षे कोल्हापूरचे पालकमंत्री म्ह्णून काम करूनही आपली डाळ येथे शिजणार नाही म्ह्णून चंद्रकांत पाटील पुण्याला पळून गेले. अडीच वर्षात केवळ ५५ दिवस ते कोल्हापुरात राहिले आहेत. त्यांनी राजकीय सोयीसाठी कोल्हापूरला वाऱ्यावर सोडले. आता निवडणूक आल्याने येथे आले आहेत. आता ही लढाई भाजप विरोधात कोल्हापूरची स्वाभिमानी जनता अशी आहे.त्यामुळे महाविकास आघाडी भक्कम असल्याचा मेसेज देण्यासाठी काँग्रेला बहुसंख्य मतांनी विजयी करण्याची गरज आहे.
यावेळी आमदार पी.एन. पाटील, आमदार संग्राम थोपटे, संजय पवार, व्ही. बी. पाटील,भारती पवार, सुरेश साळोखे, आर.के. पोवार, सचीन चव्हाण, अदिल फरास, सुरेश साळोखे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बिंदू चौकात याच काँग्रेसने काय केले असा सवाल चंद्रकांत पाटील करत आहेत, पण आम्ही पन्नास वर्षात काय केले हे सांगायला तयार आहोत. तुम्ही पाच वर्षात काय केले हे सांगा. त्यासाठी बिंदू चौकात येण्यास मी तयार आहे असे स्पष्ट करताना पालकमंत्री पाटील म्हणाले, वेळ व तारीख तुम्ही सांगा. आम्ही कधीही बिंदू चौकात येण्यास तयार आहे.
कोल्हापुरात तीन लाख भाजपचे कार्यकर्ते प्रचाराला येणार असल्याचा चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा समाचार घेताना उच्च व शिक्षण मंत्री सामंत म्हणाले, राज्यातूनच काय तर सर्व भारतातून भाजपचे कार्यकर्ते आले तरी येथील काँग्रेसचा उमेदवार नक्की विजयी होणार आहे.