गोवा जिंकल्याचं फडणवीसांचं सेलिब्रेशन पाहून राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला; म्हणाले “पोर्तुगीजांनी गोवा जिंकून…”
![Tola of NCP leader after seeing Fadnavis' celebration of Goa victory; "Portuguese conquered Goa," he said.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/NCP-Devendra-Fadanvis.jpg)
मुंबई |
गोव्यात भाजपाला मिळालेल्या यशानंतर नागपुरात या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या देवेंद्र फडणवीसांचं जंगी स्वागत करण्यात आलं. नागपूर विमानतळ ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरापर्यंत रॅला काढत यावेळी सेलिब्रेशन करण्यात आलं. यानंतर मंचावर नितीन गडकरींच्या हस्ते फडणवीसांचा सत्कारदेखील करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी गडकरींनी फडणवीसांचं कौतुक करताना अनुकूल स्थितीतही पक्षाला इतक्या जागा मिळाल्या नव्हत्या असं सांगितलं.
दरम्यान भाजपाकडून आयोजित करण्यात आलेल्या रोड शो तसंच सेलिब्रेशनवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. पोर्तुगीजांनी गोवा जिंकून महाराष्ट्रात आनंद साजरा करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा महाराष्ट्र जिंकायचा इरादा कधी सफल झाला नाही असा टोला त्यांनी लगावला आहे. अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “पोर्तुगीजांनी गोवा जिंकून महाराष्ट्रात आनंद साजरा करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा महाराष्ट्र जिंकायचा इरादा कधी सफल झाला नाही. कारण इकडे जंजिरा, सिंधुदुर्ग असे अनेक जलदुर्ग व मजबूत आरमार “छत्रपती शिवाजी महाराजांनी” निर्माण करुन ठेवले होते”.
पोर्तुगीजांनी गोवा जिंकून महाराष्ट्रात आनंद साजरा करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा महाराष्ट्र जिंकायचा इरादा कधी सफल झाला नाही कारण इकडे जंजिरा, सिंधुदुर्ग असे अनेक जलदुर्ग व मजबूत आरमार "छत्रपती शिवाजी महाराजांनी" निर्माण करुन ठेवले होते .#रोडशो pic.twitter.com/W6RnLKzppK
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 17, 2022